अमरावती : अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या पूर्वसंध्येला अर्थात २५ जून रोजी ‘खाकी’ने वेष बदलून पुसदमधून अमरावतीत आलेल्या गांजाच्या डिलिव्हरी मॅनला अटक केली. त्याच्याकडून नऊ किलो गांजा, दुचाकी, मोबाईल असा एकुण ३.४० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पंचवटी चौकातील डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्यासमोर ही कारवाई करण्यात आली.
रविवारी गुन्हे शाखेचे पथक आयुक्तालय हद्दीमध्ये पेट्रोलिंग करित असताना त्यांना पीडीएमसी परिसरात गांजा विक्रीसाठी एक इसम फिरत असल्याची पक्की खबर मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरिक्षक नरेशकुमार मुंढे व त्यांच्या पथकाने वेशभुषा बदलविली. कुणी पानटपरीचालक तर कुणी हातगाडीचालक झाला. त्यानंतर डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळा परिसरात ट्रॅप रचण्यात आला. त्या दरम्यान शेख हफिज शेख कादर (३३, रा. मोमीनपुरा मस्जिद जवळ, पुसद, जि. यवतमाळ) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातून २.७० लाख रुपये किमतीचा गांजा, गांजा वाहतूक करण्यासाठी वापरलेली मोपेड तथा दोन मोबाईल जप्त करण्यात आले. त्याला मुद्देमालासह गाडगेनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
यांनी केली कारवाई
पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त प्रशांत राजे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखाप्रमुख अर्जुन ठोसरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नरेशकुमार मुंढे, अंमलदार राजुआप्पा बाहेणकर, फिरोज खान, सतिश देशमुख, सुधिर गुडधे, सुरज चव्हाण, निवृती काकड, भुषन पदमणे यांनी ही कारवाई केली