देवेंद्र भुयारांविरुद्ध पोलिसात तक्रार; काँग्रेसची निषेध सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2022 11:20 PM2022-10-22T23:20:58+5:302022-10-22T23:22:40+5:30
अमरावती येथील श्री शिवाजी संस्थेच्या निवडणुकीच्या वेळी ठाकरे यांनी पातळी गाठली होती. मतदानाच्या दिवशी राडा करून बदनाम करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही कार्यकर्त्याला हात लावण्याचा प्रयत्न केल्यास तलवारीने हात छाटून टाकू. जुना देवेंद्र भुयार अंगात आणायला लावू नका. नदीच्या काठावरच राहायचे, माझ्या नादाला लागू नका, अशी धमकीची भाषा आ. देवेंद्र भुयार यांनी शुक्रवारच्या सभेत वापरली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : वरुड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात आ. देवेंद्र भुयार यांनी केलेले वक्तव्य प्रक्षोभक ठरले आहे. आमदारांनी कुठल्या चौकात यावे ते सांगावे, असे आव्हानच पंचायत समिती सभापती तथा काँग्रेस नेते विक्रम ठाकरे यांनी शनिवारी या वक्तव्याच्या प्रत्युत्तरादाखल दिले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी पुतळ्यासमोर सभा घेऊन आमदारांचा निषेध केला, तसेच याप्रकरणी वरूड पोलीस ठाण्याकडे तक्रार दिली आहे.
अमरावती येथील श्री शिवाजी संस्थेच्या निवडणुकीच्या वेळी ठाकरे यांनी पातळी गाठली होती. मतदानाच्या दिवशी राडा करून बदनाम करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही कार्यकर्त्याला हात लावण्याचा प्रयत्न केल्यास तलवारीने हात छाटून टाकू. जुना देवेंद्र भुयार अंगात आणायला लावू नका. नदीच्या काठावरच राहायचे, माझ्या नादाला लागू नका, अशी धमकीची भाषा आ. देवेंद्र भुयार यांनी शुक्रवारच्या सभेत वापरली. त्याला श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीची पार्श्वभूमी होती. या निवडणुकीत हर्षवर्धन देशमुख विरुद्ध नरेशचंद्र ठाकरे असा सामना रंगला होता. ही निवडणूक हर्षवर्धन देशमुख यांनी एकतर्फी जिंकली. त्याच्या प्रीत्यर्थ आयोजित सत्कार सोहळ्यातील आ. भुयार यांच्या सभेनंतरच वातावरण तापायला सुरुवात झाली. वादग्रस्त वक्तव्यामुळे विरोधक चांगलेच संतापले. मला जुना देवेंद्र भुयार पाहायचा आहे, असे आव्हानच सभापती विक्रम ठाकरे यांनी देत, कुठल्या चौकात यायचे ते सांगा, अशी लढाईची भाषा त्यांनी केली. शनिवारी दुपारी ४ वाजता याच मुद्द्यावर त्यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महात्मा गांधी पुतळ्यासमोर निषेध सभा झाली. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आमदारांना अशोभनीय अशी ही भाषा असल्याचे सांगत निषेध केला. सायंकाळी ५ च्या सुमारास विक्रम ठाकरेंसह कार्यकर्त्यांनी ठाणेदार प्रदीप चौगावकर यांना आ. देवेंद्र भुयार यांच्याविरुद्ध तक्रार दिली. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबाराव बहुरूपी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर दाभाडे, शहराध्यक्ष उल्हास लेकुरवाळे, धनंजय बोकडे, वैभव पोतदार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
जागा तुझी, वेळ तुझा सोक्षमोक्षसाठी मी हाजीर
वरुड-मोर्शी मतदारसंघ जणू युपी-बिहारकडे वाटचाल करीत आहे. आमदार देवेंद्र भुयार यांनी प्रक्षोभक आणि भडकावू भाषण करुन तलवारीने हात छाटण्याची जाहीर धमकी दिली. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदचे माजी सदस्य विक्रम ठाकरे यांनी आमदार भुयार यांना जागा तुझी, वेळ तुझा सोक्षमोक्ष करण्यासाठी मी हाजीर असेल, असे आव्हान यांनी दिले. त्यामुळे भुयार-ठाकरे वाद पुढे आला आहे.
विक्रम ठाकरे यांच्याकडून तक्रार प्राप्त झाली आहे. ती चौकशीकरिता ठेवण्यात आली आहे. त्यावर योग्य कायदेशीर कार्यवाही केली जाईल.
- प्रदीप चौगावकर, ठाणेदार, वरूड