लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पोलीस दादा, तुम्ही गुन्हेगारांना खरेच मारता का हो, सायबर गुन्हे म्हणजे काय हो, झीरो डायरी कशाला म्हणतात, अशा एक ना अनेक विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे पोलिसांना द्यावी लागली. शुक्रवारी राजापेठ पोलीस ठाण्याला स्कूल आॅफ स्कॉलर्स शाळेतील विद्यार्थ्यांनी भेट देऊन पोलिसांविषयी आपले मत व्यक्त करून, त्यांचे भरभरून कौतुकसुद्धा केले.कायदा व सुव्यस्थेची धुरा सांभाळणारे पोलीस गुन्हेगारांना वठणीवर आणण्याचे सातत्याने प्रयत्न करतात. पोलिसी खाक्याच्या धाकाने अनेकांची थरकाप उडते. मात्र, शुक्रवारी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना पोलीस क्षणभर विचारात पडले. अडीचशेवर विद्यार्थ्यांनी शुक्रवारी 'जॉय आॅफ गिव्हींग' उपक्रमातून राजापेठ ठाण्याला भेट दिली. शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांचा किलबिलाटाकडे सर्वांचे लक्ष वेधल्या गेले. पीआय किशोर सूर्यवंशी यांनी चिमुकल्यांसह शिक्षकांचेसुद्धा स्वागत केले. विद्यार्थ्यांनी बहुतांश पोलिसांशी दिलखुलास संवाद साधून प्रश्नांची उत्तरे शोधली. ठाण्यात कामकाज कशाप्रकारे चालतात, याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. राजापेठ पोलिसांनी विद्यार्थ्यांना बंदुक, रायफलसह अन्य सर्व शस्त्रांसंबंधित माहिती दिली. त्यांच्या कामाचे स्वरुप, कामकाज कशा पद्धतीने चालतात, एफआयआर नोंदविण्यासाठी काय काय करावे लागले, वायरलेस कसा वापरला जातो, त्यावरून संदेश कसे पाठविले जाते, कशाप्रकारे तक्रार दाखल केली जाते, ती आॅनलाईन कशी केली जाते, अशी इत्थंभूत माहिती विद्यार्थ्यांनी अंतर्मनातून ऐकली. विद्यार्थ्यांनी पोलीस कोठडीसुद्धा जवळून बघितली. त्यात गुन्हेगारांना कशाप्रकारे ठेवले जाते, याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. व्यासपीठावर पोलीस निरीक्षक, एएसआय अरुण मेश्राम, पोलीस अरुण दरवई, भुजाडे मेजर, सुनील लासुरकर, राजू लांजेवार यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी पोलिसांविषयी मत मांडले. त्यांचे मत ऐकून पोलीस गहिवरले.ठाणेदार सूर्यवंशींना दिले ग्रीटिंग कार्डशिक्षकवृंद रवि जयस्वाल, संजू सातरोटे, प्रिया देशमुख, कृष्णा तिवारी, अरुण बरडे यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी हाताने बनविलेले विविध प्रकारचे आकर्षक ग्रीटिंग कार्ड पोलिसांना दिले. विद्यार्थ्यांनी स्वहस्ताक्षराने ग्रीटिंग कार्डवर लिहिलेले पोलिसांविषयी कौतुकास्पद भाष्य व कविता पाहून ठाणेदार सूर्यवंशी गहिवरले. ऋग्वेद फिस्के नावाच्या विद्यार्थ्याने 'ते माझे पोलीस' ही कविता सर्वांसमोर वाचून दाखविली. त्यामधून पोलिसांच्या कठोर परिश्रमांचे सत्यकथन त्या विद्यार्थ्याने कवितेतून विशद केले. याशिवाय ‘यू आर द बेस्ट’, ‘पोलीस मॅन अवर हीरो’ असे पोलिसांविषयीचे मत ग्रिटींग कार्डातून व्यक्त केले गेले.
पोलीस दादा, तुम्ही गुन्हेगारांना खरेच मारता का हो!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 10:36 PM
पोलीस दादा, तुम्ही गुन्हेगारांना खरेच मारता का हो, सायबर गुन्हे म्हणजे काय हो, झीरो डायरी कशाला म्हणतात, अशा एक ना अनेक विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे पोलिसांना द्यावी लागली. शुक्रवारी राजापेठ पोलीस ठाण्याला स्कूल आॅफ स्कॉलर्स शाळेतील विद्यार्थ्यांनी भेट देऊन पोलिसांविषयी आपले मत व्यक्त करून, त्यांचे भरभरून कौतुकसुद्धा केले.
ठळक मुद्देविद्यार्थ्यांचे प्रश्न : स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या विद्यार्थ्यांची राजापेठ ठाण्याला भेट