अमरावती : मागील आठवड्यातील १२ व १३ रोजी उफाळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हल्लेखोर व आंदोलकांची धरपकड सुरू असताना इंटरनेट बंदी उठल्यानंतर ट्विटर, फेसबुकवरील आक्षेपार्ह ‘पोस्ट’ची चिरफाड सुरू करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल निर्माण करण्यात आला असून, ‘वन टू वन’ पोस्टची पाहणी केल्यानंतर ट्विटर व फेसबुकवरील पाच पोस्टप्रकरणी पाच जणांविरुद्ध भादंविच्या ५०५ (२) या गंभीर व अजामीनपात्र कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील तीन आक्षेपार्ह पोस्ट ट्विटरवर तर, दोन पोस्ट फेसबुकवर अपलोड करण्यात आल्या आहेत. दोन भिन्न गटांमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याच्या हेतूने त्या पोस्ट करण्यात आल्या. त्यात आक्षेपार्ह फोटोदेखील पाठविण्यात आले. ट्विटरवरील तीन पोस्ट अनुक्रमे १३ नोव्हेंबरला सायंकाळी ६.१, १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ व त्याच दिवशी सकाळी ९.२२ मिनिटांनी अपलोड करण्यात आल्या तर फेसबुकवर १५ नोव्हेंबर सकाळी ११.५७ व १९ नोव्हेंबरला दुपारी ३.४२ मिनिटांनी अपलोड केल्याचे निदर्शनास आले आहे.
ट्विटरवरील ‘त्या’ पोस्टमुळे जातीय तेढ?
ट्विटर व फेसबुकवरील त्या पोस्ट शहरात जातीय तेढ निर्माण करण्यास कारणीभूत ठरल्याचे निरीक्षण सायबर पोलिसांनी नोंदविले आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्याच्या ठाणेदार सीमा दाताळकर यांच्या तक्रारीवरून कोतवाली, राजापेठ पोलिसांनी पाच अकाऊंट धारकांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
शहरात १२ नोव्हेंबरला दुपारनंतर निघालेल्या मोर्चादरम्यान दगडफेक, लूटमार करण्यात आली होती. त्या निषेधार्थ १३ नोव्हेंबरला भाजपने बंदची हाक दिली. त्यादिवशीदेखील अनेक भागांत हिंसाचार उफाळून आला १३ नोव्हेंबरला सकाळीच संचारबंदी व इंटरनेट बंदी लागू करण्यात आली. इंटरनेट बंदी असताना विशिष्ट समुदायाचे नाव नमूद असलेल्या अकाैंटधारकांनी त्या दोन घटनांच्या अनुषंगाने दोन भिन्न गटांमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याच्या हेतूने छायाचित्रे व पोस्ट प्रसारित केली.
काय आहे ५०५ (२)?
ज्या विधानांमुळे सामाजिक सलोखा धोक्यात येईल. समाजांमध्ये शत्रुत्वाची भावना निर्माण होईल अशा विधानांबाबत भारतीय दंडविधानाची कलम ५०५ (२) आहे. यामध्ये तीन वर्षांपर्यंत शिक्षा, दंड वा दोन्ही शिक्षांची तरतूद आहे. हा गुन्हा अजामीनपात्र आहे.