नरेंद्र जावरे
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : जिल्हा ग्रामीण पोलीस दलातर्फे येथील हरिकेन पॉइंटवर उभारलेल्या पोलीस विश्रामगृहाचे रविवारी उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला आपल्याला डावलल्याचा आरोप स्थानिक आमदार राजकुमार पटेल यांनी केला. ते याप्रकरणी विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव दाखल करणार आहेत. दुसरीकडे ग्रामीण पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. यांनी आ. पटेल यांचे आरोप फेटाळले आहेत.
नव्या पोलीस विश्रामगृहाचे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रम आयोजित करणाऱ्या संबंधित विभागाने प्रोटोकॉलनुसार स्थानिक आमदाराला निमंत्रित करणे गरजेचे होते. परंतु, आपणास निमंत्रित करण्यात आले नाही. त्यामुळे आदिवासी आमदाराला हेतुपुरस्सर डावलल्याबाबत हक्कभंग प्रस्ताव विधानसभेत दाखल करणार आहोत, असे आमदार पटेल यांनी स्पष्ट केले.
सार्वजनिक बांधकाम विभागाने वर्षभरापूर्वी पोलीस विश्रामगृहाचे बांधकाम करून दिले. मात्र, उद्घाटन समारंभाचे आयोजन आमच्याकडून करण्यात आलेले नाही, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहत्रे यांनी सांगितले.
कोट
कार्यक्रम पत्रिका छापल्या नाहीत. आमदार महोदयांना ठाणेदारांकरवी निरोप पाठविला. मी फोनदेखील केला. मात्र, तो रिसिव्ह करण्यात आला नाही. डावलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
- हरी बालाजी एन., पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण
कोट
प्रोटोकॉलनुसार स्थानिक आमदाराला निमंत्रण देणे गरजेचे असताना त्याबाबत कुठल्याच प्रकारची माहिती दिली गेली नाही. त्यामुळे विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव दाखल करू.
- राजकुमार पटेल, आमदार, मेळघाट