अमरावती : गोव्यातील कळंगुट पुलाजवळील पाण्यात बुडालेल्या पाच जणांपैकी एक मृतक दर्यापूर ठाण्याचा पोलीस कर्मचारी असल्याची माहिती आहे. पाचपैकी तिघांचे मृतदेह सद्यस्थितीत पोलिसांच्या हाती लागले, तर दोघांचा शोध सुरू आहे. बुडालेले पाच जण अकोला जिल्ह्यातील असून मृतांमध्ये दोन भावांचा समावेश आहे. त्यापैकी मृतक प्रीतेश लंकेश्वर नंदागवळी (३२, पोलीस शिपाई) हे अमरावती ग्रामीणमध्ये कार्यरत होते. त्याच्याच लहान भाऊ चेतन लंकेश्वर नंदागवळी (२७, उमरी, विठ्ठलनगर अकोला) याचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. प्रीतेश नंदागवळी सन २००८ मध्ये अमरावती ग्रामीण जिल्हा पोलीस विभागात शिपाईपदी रुजू झाले होते. २०१० ते २०१५ या कालावधीत येवदा पोलीस ठाण्यात कार्यरत होते. पोलीस परिवहन महामंडळची परीक्षा पास होऊन दर्यापूर उपविभागीय पोलीस अधिका-यांच्या वाहनावर चालक म्हणून काम करीत होते. तसेच काही महिन्यांपासून दर्यापूर ठाण्याच्या वाहनावर चालकपदी काम करीत असताना २ जूनपासून रजेवर असताना हा अपघात घडला. प्रितेश यांच्या वडिलांचे २७ आक्टोम्बर २०१६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. प्रितेश यांची पत्नी चार महिन्यांची गर्भवती असल्याचे नातेवाईकांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. प्रितेश यांच्या मृत्यूमुळे नंदागवळी कुटुंबीयावर दु:खांचे डोंगर कोसळले असून, गावातही शोककळा पसरली आहे.
जीवलग मित्र हरवलादर्यापूर पोलीस ठाण्याच्या वाहनावर चालक म्हणून प्रितेश काही महिन्यापासून रुजू झाला, त्याने कर्तव्यावर असताना कधीच कामचुकारपणा केला नाही. तो गोव्यातील समुद्रात बुडाल्याची माहिती मिळताच मोठा धक्का बसला. त्यामुळे माझा एक जीवलग मित्र हरविला, अशी प्रतिक्रिया दर्यापूरचे ठाणेदार मुुकुंद ठाकरे यांनी दिली.