अमरावती : गाडगेनगर पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी वाहतूक शाखेतून बदली होऊन गेलेले पोलीस हवालदार अंबिकाप्रसाद बद्रिप्रसाद यादव (४८, रा. पोलीस क्वॉर्टर) यांचा कर्तव्यावर असतानाच हृदयविकाराने मृत्यू झाला.
अंबिकाप्रसाद यादव चार वर्षांपासून वाहतूक शाखेत कर्तव्यावर होते. मात्र, महिन्याभरापूर्वी त्यांची बदली गाडगेनगर पोलीस ठाण्यात झाली. रविवारी रात्री गाडगेनगर पोलीस ठाण्यात ते कर्तव्य बजावत होते. पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास अचानक त्यांच्या छातीत दुखायला लागले. ठाण्यातील सहका-यांनी अंबिकाप्रसाद यांना तत्काळ खासगी रुग्णालयात नेले. अतिदक्षता कक्षात त्यांच्यावर डॉक्टरांनी उपचार सुरू केले. दुपारी १२ वाजता डॉक्टरांनी अंबिकाप्रसाद यांना मृत घोषित केले. हृदयविकाराच्या झटक्याने अंबिकाप्रसाद यांचा मृत्यू झाल्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तविली आहे. त्यांचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आला.
अंबिकाप्रसाद यांच्या पश्चात पत्नी आशा, मुलगा विशाल व मुलगी पुजा असा आप्तपरिवार आहे. त्यांचा मुलगा विशाल हा अमेरिका येथील कंपनीत कार्यरत आहे. तो मंगळवारपर्यंत अमरावतीत येईल. त्यानंतर अंबिकाप्रसाद यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. कर्तव्यदक्ष असणारे अंबिकाप्रसाद यादव यांच्या मृत्यूने पोलीस वर्तुळात शोककळा पसरली आहे.
मानसिक तणावाची चर्चाअंबिकाप्रसाद यादव यांची बदली गाडगेनगर ठाण्यात झाली. यापूर्वीही त्यांनी दोन वेळा गाडगेनगर पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावले होते. गाडगेनगर पोलीस ठाण्यात कामाचा प्रचंड ताण असल्याचे यादव त्यांच्या सहकाºयांना सांगत होते. बदलीच्या अनुषंगाने ते वरिष्ठ पोलीस अधिका-यांकडे गेले होते. मुख्यालय देण्याची विनंती त्यांनी केली होती. मात्र, दोन महिने थांबा, असे सांगण्यात आल्याचे यादव त्यांच्या गाडगेनगर ठाण्यातील सहकार्यांना सांगत होते. कामाचा वाढत्या तणावामुळे ते मानसिक तणावात असल्याचे गाडगेनगर ठाण्यात चर्चा सुरू आहे.