आॅनलाईन लोकमतअमरावती : महापालिकेचे अभ्यासू पशू शल्यचिकित्सक सुधीर गावंडे यांच्या आत्मघाताला १२ दिवस पूर्ण झाल्यानंतरही गुन्हा दाखल न झाल्याने महापालिका आयुक्त हेमंत पवार आणि सहायक पशू शल्यचिकित्सक सचिन बोंद्रे निर्धास्त झाले आहेत. सुधीर गावंडे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप या उभय अधिकाऱ्यांवर आहे. त्यांच्या या स्वस्थतेला राजापेठ पोलिसांनी भक्कम पाठबळ दिले आहे.सुधीर गावंडे यांनी ११ डिसेंबर रोजी स्वत:ला संपविले. त्यांच्या पार्थिवाची उत्तरीय तपासणी होण्याआधी पत्नी जया आणि त्यांचे वडील साहेबराव गावंडे यांनी मनावर दगड ठेवून १२ डिसेंबरला याप्रकरणी तक्रार दाखल केली. गावंडे यांनी आत्महत्येपूर्वी साधलेला आत्मसंवाद त्यांनी राजापेठ पोलिसांना लेखी दिला. या प्रकरणाची तातडीने चौकशी करुन आयुक्त व बोंद्रे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची आर्जव त्यांनी केली. तक्रार दाखल करुन घेतल्यानंतर मागील शुक्रवारी राजापेठ पोलिसांना आनुषंगिक दस्तऐवज मिळाले. पोलिसांनी अगदी अंतिम परीक्षेसारखा त्या दस्तावेजांचा अभ्यास चालविला असून, संपूर्ण खात्री झाल्यानंतरच आपण आयुक्त वा बोंद्रेविरुद्ध गुन्हा दाखल करावा की कसे, याबाबत निर्णय घेणार असल्याचे राजापेठ पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांची याबाबतची भूमिका सर्वस्वी संशयास्पद असली तरी त्यांची ती भूमिका पवार व बोंद्रे यांना अतिशय पूरक ठरली आहे.दहा दिवसानंतरही या प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात न आल्याने दोषींचे फावले असून, ते तूर्तास विश्वविजय करून परतल्याच्या अविर्भावात आहेत. आपले कुणीही काहीही बिघडवू शकत नाही, आपले ‘गॉडफादर’ अमरावतीतच नव्हे तर मुंबईतही बसले असल्याचे त्यांच्या देहबोलीतून स्पष्टपणे अधोरेखित होऊ लागले आहे. या गंभीर प्रकरणातून बाहेर पडल्याचा आनंद वजा अहंकार काहींच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत आहे आणि त्याचे पातक आता राजापेठ पोलिसांच्या माथी लागणार आहे. कनिष्ठ अधिकाºयाला वरिष्ठाचा पदभार देताना त्या वरिष्ठाचे परतीचे दोर कापले जातात काय, रजेवरून परतल्यानंतर कुठल्या पदावर रुजू व्हायचे याबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित होतात काय आणि त्या अधिकाऱ्याला ‘डीई’ची नोटीस मिळाल्यानंतर तो आत्महत्या करतो काय, ही सारीच घटना सुन्न करणारी आहे. तरीही पोलिसांना गूढ उकलता आले नाही.
पोलिसांच्या ‘धोरणा’ने पवार, बोंद्रे निर्धास्त !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 10:27 PM
महापालिकेचे अभ्यासू पशू शल्यचिकित्सक सुधीर गावंडे यांच्या आत्मघाताला १२ दिवस पूर्ण झाल्यानंतरही गुन्हा दाखल न झाल्याने महापालिका आयुक्त हेमंत पवार आणि सहायक पशू शल्यचिकित्सक सचिन बोंद्रे निर्धास्त झाले आहेत.
ठळक मुद्देगावंडे आत्महत्या प्रकरण : बदलीचे वारे जोरात, वरदहस्त पावला