अमरावती : मालमत्तेच्या थकीत कराच्या वसुलीकरिता महापालिका पथकासोबत असलेले पोलीस अधिकारी आणि एका व्यावसायिकामध्ये धुमश्चक्री उडाली. ही घटना शुक्रवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास सक्करसाथ भागातील बालाजी ट्रस्ट संकुलात घडली. या भागातील व्यावसायिकांनी एकत्र येऊन व संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली. या घटनेची दखल घेत पोलीस उपायुक्त नितीन पवार खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी निष्पक्ष चौकशीचे आश्वासन दिल्यानंतरच व्यापारी शांत झाले. शुक्रवारी सकाळी भाजीबाजार झोनचे सहायक आयुक्त प्रवीण इंगोले अधिनस्थ कर्मचाऱ्यांसह बालाजी ट्रस्टच्या व्यापारी संकुलातील २६ दुकाने सील लावण्यास पोहोचले. खराटे यांनी पकडली कॉलर?अमरावती : यावेळी महापालिका पथकासोबत सहायक पोलीस निरीक्षक रामभाऊ खराटे आणि अन्य पोलीस कर्मचारी सुध्दा होते. या दुकानमालकांकडे मालमत्ता कराचे १ लाख ३० हजार ८४६ रूपये थकीत आहेत. ही दुकाने सील करीत असताना हे पथक ‘जय ट्रेडर्स’ या दुकानामध्ये पोहोचले. दुकानाचे समोरील दोन शटर्स बंद असल्याने पथकातील काही कर्मचारी दुकानाच्या मागील बाजूने गेले. त्यावेळी आतमध्ये दोन ते तीन जण काम करीत होते. हे प्रतिष्ठान सील करण्यासाठी आल्याचे प्रवीण इंगोले यांनी जय ट्रेडर्सचे सुधीर सोमाणी यांना सांगितले. त्याचवेळी एपीआय खराटे आत शिरले.लॅपटॉपवर काम करीत असल्याने १० मिनिटे द्यावीत, अशी विनंती सोमाणी यांनी केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, खराटे यांनी शिवीगाळ करीत कॉलर पकडून दुकानातून हुसकावून काढल्याचा आरोप सोमाणी यांनी केला आहे. महापालिका कर्मचाऱ्यांच्या समक्षच खराटे आणि सोमाणी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. खराटे यांनी पोलिसी खाक्या दाखवून मारहाण केल्याचा आरोप देखील सोमाणी यांनी केला. त्यामुळे व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेलेली सराफा मंडळीही तत्काळ परतली आणि व्यापाऱ्यांचा मोठा जमाव खोलापुरी गेट ठाण्यात दाखल झाला. खराटे यांना निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली. पोलीस उपायुक्त नितीन पवार ठाण्यात पोहोचले. यावेळी सहायक आयुक्त प्रवीण इंगोले यांच्याकडूनही पोलिसांनी माहिती जाणून घेतली. मात्र, आपल्या समोर मारहाण किंवा शिवीगाळ झाली नसल्याचे त्यांनी पवार यांना सांगितले. खराटे, महापालिका अधिकारी आणि व्यावसायिकांची बाजू समजून घेत पवार यांनी नि:ष्पक्ष चौकशी करण्याचे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)सील उघडलेसक्करसाथ परिसरातील छत्रपुरी बालाजी मंदिर संस्थानच्या मालकीच्या २६ दुकानांवर १ लाख ३० हजार ८४६ रुपये मालमत्ता कर थकीत होता. त्यासाठी शुक्रवारी यातील २४ दुकाने सील करण्यात आली. मात्र, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी ५० हजार रुपयांचा धनादेश तत्काळ दिला व उर्वरित थकीत कराचा भरणा ३१ मार्चपूर्वी करण्याची लेखी हमी दिली. त्यानंतर सर्व दुकानांचे सील उघडण्यात आले.
व्यापारी संकुलात पोलीस-व्यावसायिकांमध्ये धुमश्चक्री
By admin | Published: March 05, 2016 12:08 AM