अमरावती : पोलीस आयुक्तांचे विशेष पथक व गाडगेनगर पोलिसांनी तपोवन परिसरातील कसबा कॅफेवर धाड टाकून हुक्का पार्लरचा अड्डा उद्ध्वस्त केला. हुक्का व इतर साहित्य असा १८ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल सोमवारी जप्त केला. याप्रकरणी कॅफेचे संचालक व मॅनेजरला पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलीस सूत्रानुसार, कसबा कॅफेचे संचालक गौरव खंडेलवाल, (३१) व मॅनेजर कमलेश तायडे (३०, रा. अमरावती) याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी गाडगेनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या आदेशाने विशेष पथकातील एपीआय पंकज चक्रे व पथकाने तपोवन परिसरातील कसबा कॅफे येथे धाड टाकली. तेथे नियमबाह्य हुक्का सुरू होता. यात पाच हजार रुपये किमतीचे पाच नग हुक्का स्पॉट, पाच हजारांचे २५ नग पाईप, ३३० रुपयांचे ११ नग चिलम, सात नग हुक्का फेलेव्हर, असा एकूण साडेअठरा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.