अमरावती : ग्रामीण पोलीस दलातील २०७ पोलिस शिपाई व चालक पोलिस शिपाई पदासाठी एकूण २७ हजार ९८१ उमेदवारांचे अर्ज आले असून, १९ जूनपासून त्यांची मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. ग्रामीण पोलिसांची मैदानी भरती प्रक्रीया जोग स्टेडियमवर होणार असून दरदिवशी पहाटे पाच वाजतापासून ती भरती प्रक्रीया सुरू होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी सोमवारी दिली. प्रत्येक उमेदवाराला इमेल व मेसेज पाठविण्यात आला आहे.ग्रामीण पोलिसांच्या आस्थापनेसाठी होत असलेल्या या भरतीसाठी १९८ पोलिस शिपाई तर ९ जागा या पोलीस शिपाई चालक पदाकरीता आहेत. पोलीस शिपाई पदाकरीता पुरूष उमेदवारांचे १८ हजार ४१९ व महिला उमेदवारांचे ७१३० असे एकूण २५ हजार ५४९ अर्ज प्राप्त झाले आहेत. तसेच पोलीस शिपाई चालक पदाकरीता पुरूष उमेदवारांचे २३९१ तर महिला उमेदवारांचे ४१ असे एकुण २४३२ अर्ज प्राप्त झाले आहेत. १९ जूनपासून सुरू होणाऱ्या मैदानी चाचणीसाठी तयारी पूर्ण झाली आहे. १९ जुनला आठशे उमेदवारांना बोलविण्यात आले आहे. या सर्व उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. कागदपत्र परिपूर्ण असलेल्या उमेदवारांना मैदानी चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. तत्पूर्वी उंचीचे मोजमाप होणार आहे. मैदानी चाचणीमध्ये १६०० मीटर व १०० मीटर धावणे तसेच गोळाफेक राहणार असून या तिन्ही इव्हेंटसाठी उमेदवारांना ५० पैकी गुण दिले जाणार आहे. याचवेळी महिला उमेदवारांना ८०० मीटर व १०० मीटर धावणे तसेच गोळाफेक राहणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने ग्रामिण पोलिसांनी भरती काळात दरदिवशी एसडीपीओंसह ४०० पोलिस अधिकारी, अंमलदार तैनात ठेवले आहे. प्रत्येक इव्हेंटजवळ व्हिडीओग्राफर, छायाचित्रकार सुद्धा नेमले आहेत. भरती प्रक्रियेत मैदानात सर्वत्र सीसीटीव्ही असतील. एकूण १९८ जागांपैकी ६० व ९ पैकी एक अशा एकुण ६१ जागा महिलांसाठी राखीव आहेत.
तर दुसऱ्या तारखेचा पर्याय
पावसाळा सुरू होत असल्याने पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान संपूर्ण दिवस पाऊस आल्यास किंवा पावसामुळे त्या दिवशी मैदानी चाचणी घेणे शक्य नसल्यास उमेदवारांना पुढील तारीख देण्यात येईल. काही उमेदवारांना वेगवेगळ्या पदांकरीता एकापेक्षा जास्त ठिकाणी आणि एकच दिवशी मैदानी चाचणीकरीता हजर राहण्याची सुचना प्राप्त झाली असेल, अशा उमेदवारांना दुसरी तारीख दिली जाईल. काही उमेदवारांना इतर अडचणी असल्यास त्याचे निरसन स्थानिक पातळीवर करण्यात येईल.
पोलीस भरतीमध्ये कोणताही व्यक्ती हा उमेदवारास संपर्क साधून पैशाच्या मोबदल्यात भरतीत निवड निश्चित करण्याचे प्रलोभन दाखवित असल्यास उमेदवाराने प्रलोभनास बळी पडू नये. त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती किंवा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करावी.विशाल आनंद,पोलीस अधीक्षक