अमरावती: शहर व ग्रामीण पोलीस दलात शिपाई व चालक शिपाई म्हणून जागा पटकावण्यासाठी आरंभलेली बहुप्रतिक्षित पोलीस भरती प्रक्रिया २ जानेवारीपासून सुरू होत आहे. ग्रामीण पोलीस दलातील १९७ आणि शहरातील ४१ पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. त्यासाठी १५ हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. शारीरिक चाचणीनंतर पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा होणार आहे. २ जानेवारी रोजी सकाळी सहा वाजता पासून येथील पोलीस मुख्यालयस्थित कवायत मैदानावर ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
शहर पोलीस आयुक्तालयातील ४१ पदांसाठी २२४९ तरुण-तरुणींनी अर्ज भरले आहेत. त्यामध्ये अनेक उच्चशिक्षित तरुणांचाही समावेश आहे. पोलीस भरतीमध्ये शिपाईपदाच्या २० जागांसाठी १३९० तर चालकांच्या २१ जागांसाठी ८५९ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. तर, अमरावती ग्रामीण पोलीस दलातही १९७ पदांसाठी देखील सोमवारपासून भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यासाठी १३ हजारांवरून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. भरती प्रक्रियेची तयारी अंतिम टप्प्यात आहे. स्थानिक मंथन सभागृहासमोरील ग्रामीण पोलीस मुख्यालयात शिपाईपदाच्या १५६ व चालकांच्या ४१ पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे.
प्रवेशपत्र ऑनलाईन
उमेदवारांना प्रवेश पत्र ऑनलाईन पध्दतीने प्राप्त होतील. भरती प्रक्रीयेत डमी उमेदवार आढळून आल्यास त्या उमेदवारावर कायदेशिर कारवाई करण्यात येईल. पोलीस भरतीमध्ये कोणत्याही प्रकारे वशिलेबाजी, शिफारस, नियमबाहयता व गैरप्रकाराला मुळीच वाव राहणार नाही. यादृष्टीने अत्यंत काटेकोरपणे नियमानुसार प्रक्रीया होणार आहे.
तर एसीबीकडे करा तक्रारया भरतीच्या संबंधाने भरती करून देतो, नोकरी लावून देतो, माझी खूप ओळख आहे असे सांगून कोणी लाचखोरी करीत असेल अथवा पैशाची मागणी करीत असेल तर अशा प्रलोभन देणा-या व्यक्तीपासून सर्व संबंधित उमेदवारांनी सावध रहावे, कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये, असे आढळून आल्यास त्याबाबतची तक्रार पोलीस आयुक्त कार्यालय, पोलीस नियंत्रण कक्ष, वा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
नो मोबाईल, नो नशा
पोलीस भरतीकरीता येतांना सर्व मुळ कागदपत्रे, चार पासपोर्ट साईज फोटो सोबत आणावे. उमेदवारास भरतीच्या परिसरामध्ये भ्रमणध्वणी सोबत बाळगता येणार नाही. तसे आढळल्यास कारवाईला सामोर जावे लागणार आहे. उमेदवार चाचणीच्या वेळी मादक द्रव्य प्राशन केल्याचे आढळल्यास त्या उमेदवाराला अपात्र ठरवुन कायदेशिर कारवाई करण्यात येईल.