दर्यापूर (अमरावती) : गृहखात्यातील रिक्त पदे भरण्यासाठी शासन प्रयत्नरत असून, सात ते आठ हजार पदांसाठी लवकरच पोलीस भरती केली जाणार आहे. असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी येथे सांगितले.
लोकनेते स्व. जे. डी. पाटील उपाख्य बाबासाहेब सांगळूदकर यांच्या ५१ व्या पुण्यतिथीनिमित्त दर्यापूर येथील श्रीमती कोकिळाबाई गावंडे महिला महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विधानसभेचे माजी उपाध्यक्ष शरद तसरे, महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर, माजी मंत्री रणजित देशमुख, आदी यावेळी उपस्थित होते.
राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगून गृहमंत्री देशमुख म्हणाले की, पोलीस भरतीसह विविध स्पर्धा परीक्षांसाठी ग्रामीण तरुणांनी तयारी करून अभ्यासात सातत्य ठेवले पाहिजे. गत काही काळात घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटना लक्षात घेऊन समाजकंटकांना जरब बसण्यासाठी कठोर कायदा आणण्याचा विचार आहे. अवैध सावकारी, नक्षलवाद यांना आळा घालण्यासाठी शासन महत्त्वाची पावले उचलणार आहे. ऑल इंडिया क्राइम रिपोर्टनुसार विद्यार्थी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांवर अवास्तव अपेक्षांचे ओझे लादू नये. केवळ घोकंपट्टी करणे म्हणजे अभ्यास नव्हे. मुलांची बौद्धीक वाढ होते की नाही, याकडे लक्ष देऊन मुलांना समजून घेण्यावर पालकांचा भर असला पाहिजे, असेही देशमुख यांनी सांगितले.