लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : महसूल विभाग व पोलीस प्रशासनाच्या हातावर तुरी देऊन मध्यरात्री रेतीचे अवैध उत्खनन तालुक्यात १५ दिवसांपासून सुरू होते. शासनाने रेती माफियांवर कठोर कारवाई करावी, असे आदेश देऊन सुद्धा कारवाई करण्यात आली नव्हती. यासंदर्भात 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित करताच त्याची दखल गंभीर दखल घेत पोलिसांसह महसूल विभागाने धडक कारवाई आरंभली आहे.पंधरा दिवसांपूर्वी धामणगाव रेल्वे येथील उपविभागीय अधिकारी यांच्या वाहनावर रेती तस्कराने ट्रक चढविला होता. त्यामुळे शासनाने रेती माफियांवर कारवाई करावी, असे निर्देशसुद्धा दिले होते. मात्र, त्याच धास्तीने दर्यापूर महसूल विभाग पोलीस प्रशासन रेती माफियांवर कारवाई करणार नाही का, या आशयाचे वृत्त 'लोकमत'ने प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत अखेर महसूल व पोलीस विभागाने धडक मोहीम राबवून आठ दिवसात तीन ट्रॅक्टरवर मध्यरात्रीच्या सुमारास अवैध उत्खनन सुरू असताना त्यांच्यावर कारवाई केली. यामध्ये ठाणेदार मुकुंद ठाकरे यांच्या मार्गदर्शनात ८ डिसेंबर रोजी शहरातील एकविरा शाळेसमोर रेतीने भरलेला ट्रॅक्टर क्रमांक एम. एच. २७ यु ३८४२ ताब्यात घेण्यात आला. मात्र, तो ट्रॅक्टर सोडून फरार झाला. मालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांना आरटीओच्या माध्यमातून माहिती काढून अखेर मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ट्रॅक्टर मालक दीपक डाबेराव (२७, टाटानगर दर्यापूर) याला अटक केली. आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३७९, ९, १५ पर्यावरण संरक्षण अधिनियम नुसार गुन्हा दाखल करून अटक केली. पीएसआय शरद भागवतकर, काकडे, पवन गिरी, पी थोरात आदींनी ही कारवाई केली. उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली लेहगाव ते अंतरगाव मार्गावर ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास रेती घेऊन जात असताना ट्रॅक्टर कमांक एम.एच. २९ सी. २२६४ याला रंगेहाथ अटक केली. यात चालक गणेश गावंडे, दशरथ डोंगरदिवे यांच्यावर गुन्हा दाखल केला. मंगळवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास शिवर रोड येथून नदी पात्रातून अवैधरित्या रेतीची चोरी करून पसार होत असताना ट्रॅक्टर क्रमांक एम.एच. २७ बी.बी. ३९८ याला ताब्यात घेतले. चालक गणेश सपकाळ (शिवर) याच्यावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. तहसीलदार अमोल कुंभार, राहुल चव्हाण, बी. यू.केंद्रे, बी.आर. कावरे आदींनी केली आहे.
रेती माफियांवर पोलीस,महसूलचे धाडसत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 1:01 AM