परतवाडा : गणेशोत्सवानिमित्त संवेदनशील व अतिसंवेदनशील भागात परतवाडा पोलिसांनी मंगळवारी रूट मार्च केला. रूट मार्चसोबतच दंगा काबू योजनाही घेण्यात आली. या रूट मार्चमध्ये एकूण १३ अधिकारी व १४३ अंमलदार सहभागी झाले होते.
अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक श्याम घुगे, अचलपूर उपविभागीय पोलिस अधिकारी पी.जे. अब्दागिरे, परतवाडा पोलीस ठाण्याचे नऊ अधिकारी व ५९ अंमलदार, अचलपूर पोलीस ठाण्याचे एक अधिकारी व दहा अंमलदार आणि दोन सैनिक, सरमसपुरा पोलीस ठाण्याचे एक अधिकारी व पाच अंमलदार, ब्राह्मणवाडा पोलीस ठाण्याचे एक अधिकारी व पाच अंमलदार तसेच नागपूर पिटीसी येथून आलेले २० आरपीसी, एसआरपीएफ प्लाटून, आरसीपी प्लाटून यांनी रूट मार्चला हजेरी लावली.
रूट मार्चनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. यांच्या उपस्थितीत शांतता समिती सदस्य, गणेश मंडळांचे पदाधिकारी, साऊंड सिस्टीम व्यावसायिक यांची संयुक्त सभा घेण्यात आली. सभेत शासन परिपत्रकानुसार योग्य त्या सूचना उपस्थितांना दिल्या गेल्या. गणेश विसर्जनादरम्यान कोणीही मिरवणूक काढणार नाही. कोणीही डीजे साऊंड सिस्टीमचा वापर करणार नाही आदी महत्त्वाच्या सूचना सभेदरम्यान उपस्थितांना करण्यात आल्या.