लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गत आठवड्यात रझा अकादमीने त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ काढलेल्या मोर्चानंतर अमरावती शहरात तणाव, जाळपोळ, धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्यात आले. आता पोलिसांनी अशा उपद्रवींचा शोध सुरू केला आहे.
गुरुवारपासून महत्वाच्या चौकात असलेली प्रतिष्ठाने, दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. त्यामुळे पोलिसांच्या नजरेतून सुटलेले उपद्रवी, आंदोलकांना सीसीटीव्ही फुटेजचा माध्यमातून जेरबंद करण्यात येणार आहे.
गत आठवड्यात १२ व १३ नोव्हेबर रोजी अमरावती शहरात दोन गटात तणाव उसळला. धार्मिक स्थळाचे नुकसान झाले. दुकाने, प्रतिष्ठानाची लूट केली. दगडफेक करण्यात आला. मोठ्या प्रमाणात जमाव एकत्रित आला. जाळपोळ, पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेराव करण्यात आला. अशा झालेल्या घटनेतील सूत्रधार, आरोपींचा आता पोलिसांनी शोध सुरू केला आहे. राजकमल चौक, चित्रा चौक, राजापेठ, शाम चौक, जयस्तभ चौक, मालवीय चौक, इतवारा बाजार, वलगाव मार्ग, इर्विन चौक, कॉटन मार्केट मार्ग, इर्विन ते जिल्हाधिकारी मार्गावरील जागोजागी लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजची पोलिसांनी तपासणी चालविली आहे. त्यामुळे घटनेत सामील असणाऱ्या उपद्रवींची आता काही खैर नाही.
स्वतंत्र पोलीस लागले कामाला
आंदोलनातर शहरात दोन गटांनी माजविलेला उन्माद, झालेले नुकसान आदींची शहानिशा करण्यासाठी पोलीस प्रशासनाने स्वतंत्र यंत्रणा कामी लावली आहे. नागपुरी गेट, सिटी कोतवाली, राजापेठ, गाडगेनगर या चार ठाण्यासह विशेष शाखा, गुन्हे शाखेने सर्चिंग सुरू केले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आलेले चेहरे शोधणे आणि त्यांचवर गुन्हे दाखल करणे याला पोलीस प्राधान्य देत आहे.
अनेकजण पसार
शहरात उसळलेल्या दोन गटातील वाद, हिंसक वळण, जाळपोळ अशा घटनेत सामील असलेले अनेक महत्वाचे मुख्य आरोपी शहरातून 'वॉन्टेड' झाले. नागपुरी, खोलपुरी गेट पोलीस ठाणे अंतर्गत अनेक आरोपींनी पळ काढला आहे. आतापर्यंत जे काही आरोपी पोलिसांनी अटक केले, ते जुजबी असल्याची माहिती आहे. रझा अकादमीचे म्होरके कुठे आहेत, याचा शोध पोलिसांनी अद्यापही लागलेला नाही.