अमरावती : पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकाने ११ नोव्हेंबर रोजी भातकुली येथून एकूण ८५३ कट्टे तांदूळ व ट्रक जप्त केला होता. त्या प्रकरणाच्या वेगवान तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेने एक प्रश्नावली पाठवून भातकुली तहसील प्रशासनाकडून अनुषंगिक माहिती मागितली. मात्र, तीन आठवडे होत असताना तहसीलदारांकडून त्या प्रश्नांची उत्तरे पोलिसांना मिळाली नाहीत. पोलिसांची ती प्रश्नावली ‘लय भारी’ असेल, म्हणूनच की काय, एमपीएससीद्वारे पासआऊट झालेल्या तहसीलप्रमुखांना तिचे उत्तर देण्यास अधिक वेळ लागत असेल, अशी प्रतिक्रिया पोलिस वर्तुळात उमटली आहे. विशेष म्हणजे भातकुली तहसील प्रशासनाच्या लेटलतिफीवर न्यायालयानेदेखील तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
भातकुली तहसील प्रशासनाच्या नाकावर टिच्चून पोलिसांनी तेथील आशीर्वाद मंगल कार्यालयाजवळील गजानन महाराज सभामंडपाच्या खुल्या जागेतून व एका ट्रकमधून तांदूळ जप्त केला. पोलिसांनी लागलीच त्याबाबत भातकुली तहसीलला माहिती दिली. त्यापूर्वी, ती तक्रार नोंदवायची की नाही, ती कुणी नोंदवायची, पोलिसांच्या कारवाईत अडकायचे का, यावर तहसील प्रशासन व जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात मोठा संवाद झाला. आपण त्यात पडू नये, पोलिस चौकशीचा ससेमिरा नकोच, असा सूरही आवळला गेला. गुटखा कारवाईसाठी जसे अन्न सुरक्षा अधिकारी फिर्यादी होतात, तसे व्हावे की नाही, यावर बरेच चर्वितचर्वण झाले. अखेर दोन कार्यालयीन दिवस खल केल्यानंतर नायब तहसीलदार १३ ला सायंकाळनंतर एकदाचे फिर्यादी बनले.
दरम्यान, तो तपास भातकुली पोलिस ठाण्याकडून वर्ग झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने रेशन व्यवस्थेबाबत एक प्रश्नावली भातकुली तहसीलदारांना पाठविली. त्यात भातकुली तालुक्यात रेशनधारक किती, किती योजनांतर्गत एकूण मासिक नियतन किती, रेशनचा काळाबाजार होऊ नये यासाठी आपली भरारी पथके आहेत का, असेल तर असे प्रकार उघड झाले आहेत का किंवा त्यांच्या निदर्शनास आले काय, अशा मूलभूत प्रश्नांचा समावेश आहे. मात्र, त्या पत्राचे उत्तर तहसील प्रशासनाने अद्यापही दिले नाही. विशेष म्हणजे, त्या जप्त धान्याबाबत तहसीलचे मत काय, अशी विचारणा न्यायालयाने पोलिसांना केली. मात्र, तहसीलकडून अद्याप लेखी उत्तर अप्राप्त असल्याचे सांगताच न्यायालयानेदेखील आश्चर्य व्यक्त केले.
काय म्हणाले होते नायब तहसीलदार
याबाबत नायब तहसीलदार कृष्णा गाडेकर यांनी तक्रार नोंदविली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, ट्रकचालकाने बालाजी ट्रेडर्सची सादर केलेली तांदळाची पावती ही बनावट असल्याचे निष्पन्न होत असून, अमोल महल्ले व जावेद खान हारून खान, नईम बेग ईस्माईल बेग यांनी अवैधरीत्या तांदळाची खरेदी करून तो बाहेर विक्रीला नेत असल्याचे दिसून येते. त्यामुळे ते धान्याची अफरातफरी व काळा बाजार करीत असल्याचे निष्पन्न होत असल्याचे निरीक्षण गाडेकर यांनी नोंदविले होते. त्यांचे ते कृत्य जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे उल्लघंन असल्याचे बनावट पावत्यावरून निष्पन्न होत असल्याची तक्रार गाडेकर यांनी नोंदविली होती.
पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पत्र मिळाले. त्या पत्रातील प्रश्नावलीची उत्तरे देण्याची सूचना नायब तहसीलदारांना दिली आहे. ते उत्तर पाठवतील. पोलिसांनी जप्त केलेले ते तांदूळ प्रथमदर्शनी रेशनचे नाहीत.
- नीता लबडे, तहसीलदार
११ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास भातकुली येथून तांदूळ जप्त केला होता. ते जप्त ८५३ कट्टे तांदूळ व ट्रक नेण्यासाठी भातकुली तहसील प्रशासनाने चार-पाच दिवस लावले. जप्त तांदळाबाबत एक प्रश्नावली पाठविली. त्याचे उत्तर बुधवारपर्यंत प्राप्त झालेले नाही. त्यामुळे तपास रखडला आहे.
इम्रान नायकवडे, सहायक पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा