तळेगाव दशासर : स्थानिक पोलीस ठाण्यातील गणेश विसर्जनात डीजे वाजल्याबद्दल ठाणेदारांची बुधवारी तडकाफडकी बदली करण्यात आली.
सूत्रांनुसार, रविवारपासून लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. ठिकठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मिरवणूक न काढता, ताशा-बँडचा गजर न करता शासनाने कोरोना प्रतिबंधासाठी ठरवून दिलेल्या नियमांनुसार गणेश विसर्जन केले. मात्र, बंदी घातलेल्या डीजेचा कर्कश्श आवाज ठाण्यात घुमला. शासन नियम धाब्यावर बसवत डीजेच्या तालावर पोलीस कर्मचारी नाचत असल्याचे दिसून आले. पोलीस ठाण्यातील या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाला. याबाबत नागरिकांकडून आक्षेप नोंदविताच उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी बुधवारी दुपारी १ वाजता तळेगाव दशासर पोलीस ठाण्याला भेट दिली. दरम्यान, पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची दखल घेत ठाणेदार अजय आकरे यांची तडकाफडकी बदली केली आहे.
--------------
नियम आम्हीच पाळायचे का?
पोलीस ठाण्यात डीजे वाजल्याबद्दल स्थानिक गणेश मंडळ व गावकऱ्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. नियम आमच्यासाठीच आहेत का, या पोलिसांवर कारवाई होणार का, अशी संतप्त प्रतिक्रिया गावातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
------------
एसडीपीओंची ठाण्याला भेट
उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जाधव यांनी तळेगाव ठाण्यात एक वाजताच्या सुमारास भेट घेतली. झालेल्या प्रकाराबाबत दोन दिवसात अहवाल सादर करण्यास सांगितले.