पोलीस आयुक्तांचे आदेश : पोलीस वर्तुळात खळबळलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गोवंश वाहतुकीवर अंकुश न ठेवता स्वत:चे खिसे भरण्याचे प्रयत्न करणाऱ्या "त्या" पोलीस उपनिरीक्षकाची चौकशी सहायक पोलीस आयुक्तांकडे सोपविण्यात आली आहे. पोलीस आयुक्त मंडलिक यांनी बुधवारी हे आदेश दिलेत.राज्य शासन गोवंश हत्येबाबत गंभीर असतानाही अमरावती जिल्ह्यात गोवंशाच्या अवैध वाहतुकीचे प्रकार समोर येत असतात. काही महिन्यांपूर्वी चांदूरबाजार मार्गावरील खरवाडी गावानजीक गोवंश वाहतूक करणाऱ्या एका ट्रकने कारला धडक दिली होती. याअपघातात एक जण जागीच ठार झाला होते. याअपघातानंतर जिल्ह्याभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. पोलिसांनी याची गंभीर दखल घेत गोवंश वाहतुकीवर निर्बंध घालण्याचे प्रयत्न सुरु केले होते. तत्कालीन पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी पोलीस यंत्रणेला गोवंश वाहतूक रोखण्याचे सक्त निर्देश दिले होते. त्याचप्रमाणे पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी शहरात चार ठिकाणी नाकाबंदी करण्याचे आदेश देखील दिले होते. दरम्यान काही दिवस पोलिसांचा कारवाईचा सपाटा सुरु होता. पोलिसांनी अनेक वाहनांवर कारवाई करून गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्यांना अटक देखील केली. मात्र, गोवंशाची अवैध वाहतूक कमी झाल्याने कालांतराने कारवाई देखील मंदावल्या. मात्र, याचाच लाभ घेत एका पोलीस उपनिरीक्षकाने गोवंश वाहतूक करणाऱ्यांशी हातमिळवणी करून अर्थप्राप्तीचा मार्ग शोधून काढला. चौकशीअंती कठोर कारवाईअमरावती : गैरप्रकारची कुणकुण वरिष्ठ अधिकाऱ्यांना लागताच त्या पोलीस उपनिरीक्षकाने लगेच एक कारवाई करून स्वत:च्या अंगावरील घोंगडे झटकण्याचा प्रयत्न केला. आता हा प्रकार पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्यापर्यंत पोहोचला असून त्यांनी पोलीस उपनिरीक्षकाच्या याकारभाराची चौकशी करण्याचे आदेश गाडगेनगर विभागाच्या सहायक पोलीस आयुक्तांना दिले आहेत. चौकशीअंती त्या पोलीस उपनिरीक्षकावर काय कारवाई होते, याकडे आता पोलीस वर्तुळाचे लक्ष लागले आहे. गोवंशाबाबत कोणताही गैरप्रकार खपवून घेणार नसल्याच्या सक्त सूचना पोलिसांना आधीच दिल्या होत्या. या प्रकाराच्या चौकशीचे आदेशदेखील गाडगेनगर विभागाच्या सहायक पोलीस आयुक्तांना दिले आहेत. -दत्तात्रय मंडलिक, पोलीस आयुक्त.
"त्या" पोलीस उपनिरीक्षकाच्या कारभाराची चौकशी एसीपींकडे
By admin | Published: May 11, 2017 12:06 AM