अमरावती: मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात गुटखा घेऊन येणाऱ्या तस्कराला ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी अटक केली. ५ डिसेंबर रोजी चिंचकुभ ते रेडवा मार्गादरम्यान ती कारवाई करण्यात आली. आरोपीकडून प्रतिबंधित पानमसाला, गुटख्यासह चारचाकी वाहन असा एकुण ८ लाख ३९ हजार ६५० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संतोष सत्यनारायण शर्मा (वय ४४ वर्ष रा. साईनगर कांडली परतवाडा) असे अटक गुटखा तस्कराचे नाव आहे. त्याच्याविरूध्द ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी ६ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला.
प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणारे एक चारचाकी वाहन मध्यप्रदेशकडून रेडवाकडे येत असल्याची माहिती ब्राम्हणवाडा थडी पोलिसांना गुरूवारी मिळाली. त्याआधारे पोलिसांनी ५ डिसेंबर रोजी रात्री ११.३० च्या सुमारास चिंचकुभ ते रेडवा मार्गावर सापळा रचला. मात्र वाहन चालकाला पोलिसांची चाहुल लागताच त्याने आपली कार वाहन भरधाव वेगाने रेडवा गावाकडे दामटली. पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या त्या तस्कराचा पोलिसांनी पाठलाग केला. तथा त्याला रेडवा गावाच्या पुढे रोडवर थांबविले. त्याच्याकडील एमएच २७ बीझेड १०३६ ही कार तपासली असता त्यात सुगंधित पान मसाला मिळून आला. त्यानुसार पोलिसांनी संतोष शर्मा याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुटखा व कार जप्त केली.
यांनी केली कारवाई
पोलिस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत व अचलपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी शुभम कुमार यांच्या मार्गदर्शनात ब्राह्मणवाडा थडीचे ठाणेदार उल्हास राठोड, पोलीस उपनिरीक्षक साहेबराव राजस, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किसन सपाट, राजेश तायडे, राजू मरस्कोल्हे, अनुप मानकर, दिलीप उईके यांनी केली.