अमरावती : शहरातील बहुचर्चीत अमोल वैद्य हत्याकांडप्रकरणी तीन आरोपींची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्दोष मुक्तता केली. उच्च न्यायालयाच्या या आदेशाला नांदगाव पेठ पोलीस सुप्रीम कोर्टात अपिल दाखल करून आव्हान देणार आहेत. अमोल वैद्य यांची १३ आॅगस्ट २००६ रोजी चार मारेकऱ्यानी नांदगाव पेठ पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या रिंग रोड मार्गावर निर्घूण हत्या केली होती. याप्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून सैफुल्ला खान, संजय कानोसे, मेहबूब खान पठाण यांच्यासह चौघांना अटक केली होती. यातील चौथ्या आरोपीबद्दल कुठलेही ठोस पुरावे न मीळाल्याने येथील न्यायालयाने त्याची निर्दोश सुटका केली. उर्वरीत तीन आरोपीवर आरोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या आदेशाला बचाव पक्षांच्या वकिलाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान करुन अपील दाखल केली होती. ४ मार्च २०१४ व ६ मार्च २०१४ रोजी न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आरोपींची निर्दोष सुटका केली. उच्च न्यायालयाचा हा निर्णय पोलिसांना मान्य नव्हता. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाविरूध्द सर्वोच्च न्यायालयात अपिल दाखल करण्याचा विनंती अर्ज सहसचिव विधी व न्यायविभाग महाराष्ट्र शासन नागपूर यांच्याकडे दाखल केला होता.९ जून २०१४ रोजी पोलिसांना सर्वोच्च न्यायालयात अपिल दाखल करण्याची परवानगी प्राप्त झाली आहे. नांदगाव पेठ पोलीस याप्रकरणी लवकरच सर्वोच्च न्यायालयात अपिल दाखल करणार असल्याची माहिती विधी अधिकारी अनिल विश्वकर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
सुप्रीम कोर्टात पोलीस देणार आव्हान
By admin | Published: July 05, 2014 12:32 AM