अमरावती: फरशी स्टॉप भागातून ताब्यात घेतलेल्या दोन चारचाकी वाहनांतून जप्त करण्यात आलेल्या ३.५० कोटी रुपयांच्या प्रकरणात राजापेठ पोलिसांना से दाखल करण्याचे आदेश शुक्रवारी स्थानिक न्यायालयाने दिले. सोबतच राजापेठ पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची परवानगीदेखील दिली.
राजापेठ पोलिसांनी जप्त केलेली ती ३.५० कोटींची रक्कम नीना शहा यांच्या मालकीच्या कंपनीची असून, ती वैध आहे. त्यामुळे ती रक्कम कंपनीकडे सुपूर्द करण्याचे आदेश पोलिसांना द्यावेत, असा सुपुर्दनाम्याचा अर्ज गुरुवारी कंपनीच्यावतीने ॲड. मनोजकुमार मिश्रा यांनी न्यायालयात दाखल केला होता. त्यावर शुकवारी पाचव्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. संबंधित कंपनीने त्या रकमेवर दावा केला आहे. ती रक्कम त्यांना सुपूर्द करावी की कसे, याबाबत राजापेठ पोलिसांनी त्यांची बाजू न्यायालयासमोर मांडावी, असे आदेश न्यायालयाने दिले. पुढील सुनावणी ४ ऑगस्ट रोजी होणार आहे. त्या तारखेला पोलिसांना से दाखल करावा लागणार आहे.
पोलीसही करणार तपास
या प्रकरणाचा तपास करण्याची मुभा देण्यात यावी, असा अर्ज सीआरपीसीच्या कलम १२४ नुसार राजापेठ पोलिसांनी न्यायालयात दाखल केला होता. तो अर्ज स्विकारून न्यायालयाने पोलिसांना देखील ३ कोटी ५० लाख रुपये प्रकरणाचा तपास करण्याची मुभा दिली. त्यामुळे आयकर विभागासह राजापेठ पोलिसही या प्रकरणाचा समांतर तपास करणार आहे. दरम्यान, एका तांत्रिक प्रक्रियेदरम्यान राजापेठ पोलिसांनी ती रक्कम शासकीय खात्यात ठेवली आहे.
आयकर विभाग शपथपत्र दाखल करणार
दरम्यान याबाबत आयकर विभागाचे अधिवक्ता अमोल जलतारे यांच्याशी संपर्क साधला असता, न्यायालयात शपथपत्र दाखल केल्यानंतरच याप्रकरणावर अधिक भाष्य करता येईल, असे ते म्हणाले. जलतारे यांनी २९ जुलै रोजी आयकर विभागाची बाजू न्यायालयासमक्ष मांडली होती.