अमरावती : राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ जिल्हा सामान्य रुग्णालयातून करण्यात आला. ग्रामीण व शहरी विभाग मिळून संपूर्ण जिल्ह्यात एकूण २२५० बुथवर रविवारी २ लक्ष ५० हजार ३६० बालकांना पोलिओची लस देण्यात आली.जिल्ह्यातील सर्व ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना १०० टक्के लस पाजण्याच्या दृष्टीने संपूर्ण नियोजन करण्यात आलेले आहे. ग्रामीण विभागात जिल्हा आरोग्य अधिकारी नितीन भालेराव, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये व जिल्हा रुग्णालय या ठिकाणी जिल्हा शल्य चिकीत्सक अरुण राऊत व त्यांची संपूर्ण चमू, महागनर पालिका क्षेत्रात डॉक्टर सोनी व त्यांच्या चमूनने पर्यवेक्षण केले. राज्यस्तरावरुन विविध अधिकाऱ्यांनी मोहिमेचे संनियंत्रण केले.बुथवर न येऊ शकलेल्या बालकांना १०० टक्के लसिकरण करण्याच्या दृष्टीने आयपीपीआय अंतर्गत ग्रामीण विभागात तीन दिवस व शहरी विभागात पाच दिवस आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य उपकेंद्रांच्या एएनएम व एमपीडब्ल्यू आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी घरोघरी जाऊन पोलिओची लस देतील. पल्स पोलिओ मोहिमेचा पुढचा टप्पा २२ फेब्रुवारीला राबविण्यात येणार आहे.मोहिमेच्या यशस्वीतेसाठी राज्यस्तरावरुन सुजाता सौनिक मॅडम, मुख्य सचिव सार्वजनिक आरोग्य सेवा, मुंबई, सतीश पवार, संचालक आरोग्य सेवा, अविनाश लव्हाळे, उपसंचालक आरोग्य सेवा यांनी मार्गदर्शन केले. जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांसह महापालिका आयुक्त अरूण डोंगरे यांनी या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले. जिल्हाभरातील बहुतांश बालकांना पोलिओचा डोज देण्यात आला. (प्रतिनिधी)
अडीच लाख बालकांना पोलिओ लसीकरण
By admin | Published: January 18, 2015 10:27 PM