अमरावती : आठ दिवसांवर दिवाळी हा सण येऊन ठेपला आहे. दुसरीकडे राजकीय धुळवड सुरू आहे. १५ आॅक्टोबरला निवडणूक तर १९ तारखेला लगेचच निकाल लागेल. त्यामुळे दिवाळीपूर्वीच राजकीय आतषबाजी होणार असल्याने फटाके विक्रेत्यांची चांदी होईल, हे निश्चित. निवडणुकीदरम्यान व निकाल लागल्यानंतर आपल्या नेत्याच्या रॅलीचे स्वागत करण्यासाठी फटाक्यांच्या आतषबाजीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. फटाक्यांच्या आवाजाने आणि रोषणाईने मतदारांचे लक्ष वेधले जाते. दिवसाचा प्रचार, रॅली किंवा सभा असेल तर १००० ते दहा हजार फटाक्यांच्या माळेला प्राधान्य दिले जाते. शिवाय सुतळी बॉम्बची सोबत असते. सायंकाळच्या वेळी राष्ट्रीय नेत्याची सभा असेल तर त्या मैदानावर फॅन्सी फटाक्यांची आतषबाजी केली जाते. गगनभेदी आवाज आणि रोषणाईमुळे उपस्थितांचेही मनोरंजन होते. तर रॅलीमध्ये कार्यकर्त्यांना इजा होई नये, यासाठी पेपर शॉर्ट प्रकाराच्या फॅन्सी फटाक्यांना प्राधान्य दिले जाते. एक हजार फटाक्यांची माळ ३०० रुपयांपासून तर दहा हजार फटाक्यांची माळ तीन हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. फॅन्सी फटाके विविध प्रकारात १०० रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. सध्या फटाके विक्रेत्यांच्या व्यवसायात २० टक्क्यापेक्षा अधिक वाढ झालेली आहे. येत्या काही दिवसांमध्ये प्रचाराला वेग येईल त्याप्रमाणे व्यवसाय वाढेल. निकालाच्या दिवशी कोणतीही व्यक्ती निवडून आली तर आनंदोत्सव साजरा करण्यासाठी फटाक्याशिवाय पर्याय नाही. येत्या १९ आॅक्टोबरला मिनी दिवाळी साजरी होईल, हे नक्की.
दिवाळीपूर्वीच राजकीय आतषबाजी
By admin | Published: October 14, 2014 11:12 PM