अमरावती : भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गटाने राज्यात एकत्र चूल मांडली असली तरी त्यांना समर्थन देणाऱ्या काही अपक्ष आमदारांमध्ये विस्तवही जात नसल्याचे चित्र सध्या अमरावतीच्या राजकीय वर्तुळात खमंग चर्चेचा मेन्यू झाला आहे.
अचलपूरचे आमदार माजी मंत्री बच्चू कडू आणि बडनेऱ्याचे आमदार रवी राणा एकमेकांवर आगपाखड करण्याची कुठलीही संधी सोडत नाहीत. आधी दहीहंडीच्या कार्यक्रमादरम्यान दोघांमध्ये रंगलेला कलगीतुरा राज्याने बघितला, तर आता ऐन दिवाळीच्या तोंडावर पुन्हा पॉलिटिकल शिमग्याला सुरुवात झाली आहे.
खिसे कापणारे किराणा वाटताहेत!
छत्रपतींना रक्ताची आहुती देऊन रक्तदान करून चळवळ उभी करण्याची गरज आहे. नाही तर खिसे कापणारे आता किराणा वाटप करताहेत, अशी नाव न घेता बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर जहरी टीका केली. अमरावतीत मंगळवारी आयोजित कार्यक्रमात त्यांनी आमदार रवी राणा यांच्यावर तोंडसुख घेतले. दर दिवाळीला राणा दाम्पत्य गोरगरिबांना किराणाचे वाटप करीत असतात. मागील अनेक वर्षांपासून त्यांचा हा उपक्रम सुरू आहे. यंदाही तो सुरू असताना बच्चू यांनी केलेली टीका चर्चेचा विषय आहे. महापालिका शाळांच्या दुरवस्थेबाबतही बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला. पूर्वी महापालिकेच्या शाळा दर्जेदार होत्या, आता मात्र कुणाचेही याकडे लक्ष नाही, असे म्हणत त्यांनी महापौरांच्या कार्यपद्धतीवरही ताशेरे ओढले.
बच्चू कडू सोंगाड्या, नौटंकीबाज!
आ. बच्चू कडू यांनी नाव न घेता केलेल्या टीकेवर आ. रवी राणा यांनी जोरदार पलटवार करीत त्यांना सोंगाड्या म्हटले आहे. बच्चू कडू यांना सामान्य माणसाशी काही सोयरसुतक नसून त्यांनी केलेले आंदोलन हा तोडीबाजीचा प्रकार असल्याचे राणा यांनी थेट बच्चू कडू यांचे नाव घेत म्हटले आहे. गुवाहाटीला जाणारे आमदार म्हणून त्यांचा पुन्हा उल्लेख केला. आम्हाला गोरगरिबांची जाण आहे. आदिवासींची दिवाळी आनंदमयी व्हावी, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून किराणा किट वाटपाचा आपला उपक्रम सुरू असून, गरिबांच्या आनंदातच आम्ही आनंदी असल्याचे राणा म्हणाले. एक ते दीड लाख कुटुंबांपर्यंत किट पोहोचत असल्याचा राणा दाम्पत्याचा दावा आहे. त्यामुळे गरजूंची मदत करण्याच्या कार्यावर टीका करणे हास्यास्पद असल्याचेही रवी राणा यांनी म्हटले आहे.