अमरावती : बेलोरा विमानतळाचे विस्तारीकरण आणि विकासासाठी २५० कोटी रुपयांचा आराखडा तयार करुन भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला आहे. ७५० एकर जमिनीचे अधिग्रहण पूर्ण झाले असून त्याकरीता ५८ कोटी रुपये खर्च आला आहे. विमातळाच्या विस्तारीकरणात आता १४०० मिटर ऐवजी २४०० मिटरची धावपट्टी राहणार आहे. या विमानतळाच्या पुढील विकासाची जबाबदारी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी व भारतीय विमानतळ प्राधिकराकडे सोपविण्यात आली आहे. विमानतळ विस्तारीकरणामध्ये वळण रस्त्याकरीता २० हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले असून त्याकरीता ४ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणाला सुरुवात करण्यापूर्वी सद्याचा यवतमाळ मार्ग जळू या गावापर्यंत बंद करण्याची तयारी आहे. जळू या गावापासून पुढे यवतमाळ मार्गावर वाहने वळविण्यासाठी बेलोरा ते अडगाव पुढे जळू पर्यंत वळण रस्ता निर्माण केला जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने जमिन अधिग्रहनाची प्रक्रिया पूर्ण केली असून या वळण मार्गांचे काम लवकरच सुरु होईल, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बेलोरा विमातळाच्या विस्तारीकरणाला मान्यता देत लागणाऱ्या निधीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला होता. हल्ली केंद्र शासनाने या विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक निधी मंजूर केला नाही. मात्र लोकप्रतिनीधी, राजकीय व्यक्तींनी बेलोरा विमानतळाचे विस्तारीकरण, विकास कामे मार्गी लावण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी स्थानिक उद्योजकांची आहे. विदर्भात अमरावतीच्या नंतर मंजूर झालेल्या विमानतळाचे विस्तारीकरण पूर्ण होऊन येथे विमानांची रेलचेल वाढीस लागली आहे. परंतु बेलोरा विमानतळाचे विस्तारीकरण, विकास कामे अडगळीत पडल्याचे चित्र आहे.
‘टेक आॅफ’साठी हवी राजकीय इच्छाशक्ती
By admin | Published: November 27, 2014 11:26 PM