चर्चेला ऊत : विश्वासात न घेतल्याचा राणांचा आरोपअमरावती : पालकमंत्री प्रवीण पोटे, खा. आनंदराव अडसूळ आणि आ. रवी राणा यांच्या प्रमुख उपस्थितीत होऊ घातलेले बडनेरा मतदारसंघातील विविध मंजूर कामांचे भूमिपूजन प्रतिष्ठेच्या वादात अडकल्यामुळे शनिवारी रात्री जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. बडनेरा मतदारसंघातील कामांचे भूमिपूजन करताना आपल्याला विश्वासात घेणे गरजेचे असतानाही पालकमंत्र्यांनी आपले म्हणणे कानावर न घेतल्याचा आरोप आ. रवी राणा यांनी केला आहे. उलटपक्षी तिवसा आणि दर्यापूर तालुक्यातील विकासकामांचे भूमिपूजन करताना संध्याकाळ उलटूून गेल्याने उर्वरित कामांचे भूमिपूजन सोमवारी केले जाणार असल्याचे खा. अडसूळ यांच्याकडून सांगण्यात आले आहे. याबाबत पालकमंत्र्यांशी संपर्क साधला असता ते उपलब्ध झाले नाही. भूमिपूजन होऊ न शकल्याने पोटे आणि राणांमधील मतभेद उघड झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. त्याचे झाले असे की, शनिवारी दुपारी २ ते ४ या कालावधीत बडनेरा मतदारसंघातील ३ कोटी ८९ लाख रूपयांच्या कामांचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार होते. पालकमंत्री आणि खासदार यांनी दर्यापूर व तिवसा मतदारसंघातील कामांचे भूमिपूजन केले. मात्र बडनेरा मतदारसंघातील भूमिपूजन करण्यात आले नाही.मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेपअमरावती : सायंकाळच्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाने बडनेरा मतदारसंघातील भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे आ. राणा यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले. यासंदर्भात रवी राणा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पालकमंत्र्यांवर शरसंधान साधले. माझ्याच मतदारसंघात विविध कामांचे भूमिपूजन होत असताना पालकमंत्र्यांनी याबाबत दोन-तीन दिवस आधी माहिती देणे अपेक्षित होते. माध्यमांमधील जाहिरातीतून भूमिपूजनाची माहिती मिळाली. आपण मतदारसंघात नसल्याने भूमिपूजन पुढे ढकलण्यात यावे, अशी विनंती मी त्यांना केली. तथापि पालकमंत्र्यांनी कानावर घेतले नाही. फोनलाही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे नाईलाजाने ही बाब मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातल्याचे राणा यांनी स्पष्ट केले. विकासकामांचे व पालकमंत्र्यांचे स्वागतच आहे; तथापि त्यांनी मला विश्वासात घ्यायलाच हवे, असा पुनरुच्चार त्यांनी केला. हरिसाल डिजिटल कार्यशाळेला उपस्थिती लावल्यानंतर भूमिपूजनाचे सत्र सुरू झाले. दिवसभरात जेवढे शक्य होते, तेवढ्या ठिकाणी भूमिपूजन केल्याचे सा.बां.विभागाकडून सांगण्यात आले. पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही. फलके काढली!एकाच दिवशी पालकमंत्री, खासदार आणि संबंधित आमदारांच्या उपस्थितीत दर्यापूर, तिवसा आणि भातकुली तालुक्यांतील ७ पेक्षा अधिक कामांचे भूमिपूजन शनिवारी पार पडणार होते. तथापि भातकुली तालुक्यातील आणि बडनेरा मतदारसंघात मोडणाऱ्या ४ कामांचे भूमिपूजन शनिवारी होऊ न शकल्याने बांधकाम विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ती भूमिपूजनाची फलके काढून घेतली आहेत. त्यावर आता नव्याने तारीख लिहिली जाणार असल्याचे या विभागाकडून सांगण्यात आले. आ. यशोमती ठाकूर आणि आ. रमेश बुंदिले हे त्यांच्या मतदारसंघातील कार्यक्रमाला विश्वासात न घेताच उपस्थित होते काय, हा प्रश्नही यानिमित्ताने चर्चिला जात आहे.माहिती अधिकारीही संभ्रमितबडनेरा मतदारसंघातील कामांचे भूमिपूजन पार पडल्याचे वृत्त जिल्हा माहिती कार्यालयातून देण्यात आले. मात्र त्यानंतर चुकीची कबुली देत सुधारित वृत्त पाठवीत असल्याचे जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी सांगितले.डिजिटल हरिसाल कार्यशाळा आटोपल्यानंतर भूमिपूजन आरंभण्यात आले. तिवसा व दर्यापूर मतदारसंघातील कामांचे भूमिपूजन करण्यात आले. उशिरा सायंकाळपर्यंत जेवढे शक्य झाले तेवढे केले. उर्वरित कामांचे भूमिपूजन नंतर होईल.- आनंदराव अडसूळ, खासदार, अमरावती.भूमिपूजन पुढे ढकलण्यात यावे, अशी विनंती पालकमंत्र्यांना केली होती. तथापि त्यांनी दखल घेतली नाही.हे प्रकरण मुख्यमंत्र्यांना कळविले. परिणामी भूमिपूजन रद्द झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. - रवी राणा, आमदार, बडनेरा मतदारसंघ.
भूमिपूजनाच्या मुद्यावरून राजकारण !
By admin | Published: November 29, 2015 12:47 AM