वरूड : मोर्शी विधानसभा मतदारसंघात एकूण मतदार २,६५,४०९ असून यामध्ये पुरुष मतदार १,४०,३५६, स्त्री मतदार १,२५,०५३ एवढे आहेत. यापैकी १ लाख ८३ हजार ३८२ मतदान झाले. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या. मतदान संपले आता मतमोजणीची प्रतीक्षा लागली आहे. वरुड तालुक्यात १८१ मतदान केंद्रांपैकी आठ मतदान केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आले होते. यामध्ये मोबाईल रेंज नसल्याने महेंद्री, झटामझिरी आणि कारलीचा समावेश आहे. गत निवडणुकीत ७५ टक्क्यांपेक्षा अधिक मते एकाच उमेदवाराला मिळाल्याने हातुर्णा येथील दोन आणि जरुडचे तीन मतदान केंद्र संवेदनशील घोषित करण्यात आले होते. मोर्शी तालुक्यात ११२ तर वरुड तालुक्यात १८१ मतदान केंद्र होते. यामध्ये पुरुष मतदार १ लाख ६४१ तर स्त्री मतदार ८२ हजार ७४१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. याची टक्केवारी ६९.७ होती. १९ उमेदवार रिंगणात होते. संवेदनशील मतदान केंद्रांमध्ये महेंद्री, कारली आणि झटामझिरी येथे संपर्काकरिता कुठलेही मोबाईल रेंज नसल्याने निवडणूक विभागाने बिनतारी संदेश यंत्रणा, माक्रो निरीक्षकासह चित्रीकरण आणि चोख बंदोबस्त ठेवला होता. हातुर्णा २ आणि जरुड ३ मतदान केंद्रांवर गत निवडणुकीत ७५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान एकाच उमेदवाराला झाल्याने ही पाच केंद्र संवेदनशील म्हणून घोषित केली होती. परंतु यावेळी संवेदनशील आठ केंद्रांवर शांततेत मतदान पार पडले. मोर्शी विधानसभा क्षेत्रातील १९३ केंद्रांवर निवडणूक निर्णय अधिकारी ललित वऱ्हाडे, सहायक निर्णय अधिकारी राम लंके, विजय माळवे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी गतवर्षीच्या तुलनेत मतदानात वाढ झाली आहे. वेळोवेळी मतदार जनजागृती रॅली, कार्यक्रमाव्दारे मतदारांना जागृत करण्यात आल्याने मतदानाच्या टक्केवारीत बरीच वाढ झाली. (तालुका प्रतिनिधी)
आठ संवेदनशील मतदान केंंद्रांवर शांततेत मतदान
By admin | Published: October 18, 2014 12:51 AM