लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांत बुधवार २० नोव्हेंबरला मतदान होत आहे. आहे. यासाठी सर्व मतदारसंघांत तयारी झालेली आहे. मेळघाटात दुर्गम भागात असलेल्या १९० मतदान केंद्रांवर सोमवारी मतदान पथके रवाना झाली तर उर्वरित २,५१८ केंद्रांसाठी मंगळवारी पथके रवाना होतील. निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज आहे. यावेळी मतदानाचा उच्चांकी ७० टक्का पार करेल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार यांनी सांगितले.
मतदान प्रक्रियेसाठी असलेल्या पथकात २,७०८ मतदान केंद्राध्यक्ष, ८,१२४ मतदान अधिकारी असे एकूण १०,८३२ कर्मचारी याशिवाय १,०८९ राखीव असे ११,९१९ कर्मचारी आवश्यक आहे. या सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधांची निर्मिती करण्यात आलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्मचारीदेखील केंद्रांवर मतदारांच्या सहकार्यासाठी राहणार आहे. मतदार चिठ्ठयांचे वाटप शहरात ज्या ठिकाणी राहिले, त्यांना सोमवारी वाटप होईल. सर्व मतदारांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मतदान करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.
३१९ परवानाधारकांचे अग्निशस्त्र जमा; विशाल आनंद आचारसंहितेच्या काळात ग्रामीणमधील ३१९ परवानाधारकांचे अग्निशस्त्र जमा करण्यात आलेले आहे. चार जणांकडून प्रतिसाद नसल्याने त्यांचा परवाना रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना पत्र दिले आहे. १०७ जणांवर प्रतिबंधात्मक व तीन जणांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. स्थानिक पोलिसांशिवाय सेक्टर पेट्रोलिंग सुरू आहे. सुरक्षा बंदोबस्तासाठी सात कंपनी उपलब्ध आहेत.
९७० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई; नवीनचंद्र रेड्डी आचारसंहितेच्या काळात पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत ९७० व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या. नॉनबेलेबल वॉरंट असणाऱ्या ९५१ पैकी ६१० जणांना कोर्टासमोर उभे करण्यात आले. चार जणांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई केली आहे. १५ ऑक्टोबरपासून ३०,१६१ लीटर दारू, ४२ आरोपींजवळून शस्त्र जप्त करण्यात आले. ३४ किलो गांजा, २.८१ कोटींची कॅश जप्त केल्याची माहिती पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली.