सततच्या पावसामुळे झालेली दुरावस्था शेतकऱ्यांसह मशागत करणाऱ्या बैलजोडी साठी जीवघेणी ठरत आहे.
येथील पांदण रस्त्यावर शेकडो हेक्टर बागायती शेती आहे.
या शेतशिवारांमध्ये भाजीपाला पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येते.
तळेगाव दशासर हे गाव मोठे असल्याने येथे भाजीपाला घेण्यासाठी दिवसभर व्यापारांची लगबग सुरू असते.
परंतु येथील पांदण रस्ता पूर्णपणे चिखलमय झाल्याने व आजूबाजूने मोठं - मोठे खड्डे पडल्याने शेतात वाहन जात नसल्याने व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली आहे.
त्यामुळे भाजीपाला विक्री कशी करावी, हा प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडला आहे.
गावालगत असलेला हा पांदण रस्ता येथून औरंगाबाद- नागपूर हायवेला मिळतो,त्यामुळे येथे नेहमीच वाहनांची वर्दळ असते.
या पांदण रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी झुडपे असल्याने सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती निर्माण झाली आहे.
त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन रस्ता मोकळा करून खडीकरण करावे, अशी मागणी येथील शेतकरी करीत आहेत.,
शासनाने आता खेड्यांमध्ये पांदण रस्ता ही संकल्पना मोडून काढण्यासाठी त्यांचे डांबरी रस्त्यांमध्ये रूपांतर करण्याची मोहीमच काढावी अशी मागणी तळेगाव परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.