चांदूर बाजार - स्थानिक तहसील कार्यालयात तहसीलदारांसह पाच पदे मंजूर आहेत. यात चार नायब तहसीलदारांचा समावेश आहे.यापैकी दोन नायब तहसीलदार निवृत्त झाले, तर एक नायब तहसीलदार दोन वर्षांपासून आजारी रजेवर आहेत. अशात विद्यमान तहसीलदार धीरज स्थूल हे नुकतेच दीर्घ रजेवर गेले आहेत. परिणामी चांदूर बाजार तहसील कार्यालय अधिकाऱ्यांविना पोरके झाले आहेत.
नायब तहसीलदार गजानन पाथरे यांना विधानसभा निवडणुकीच्या वेळी कर्तव्यावर असताना अपघात झाला. यात कायमस्वरूपी अपंगत्व आल्यामुळे ते रजेवर आहेत. निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार अर्जून वांदे हे मार्चमध्ये निवृत्त झाले, तर नायब तहसीलदार देवानंद सवई हे ३० जूनला निवृत्त झाले. या रिक्त पदांमुळे तहसील कार्यालयाचे कामकाज मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहे. अशातच विद्यमान तहसीलदार हे ३० जुलैपर्यंत रजेवर गेले आहेत. कार्यालयात मुख्य अधिकारीच नसल्यामुळे स्थानिक पातळीवरील कामकाज पूर्णतः ठप्प होण्याची वेळ येऊन ठेपली आहे. सध्या तहसील कार्यालयात एकमेव निवासी नायब तहसीलदार संतोष कारसकर हे कार्यरत आहेत. त्यांच्यावर सध्या तहसील कार्यालयाचा संपूर्ण भार येऊन पडला आहे. परंतु, अपघातामुळे त्यांनाही अपंगत्व आले आहे. त्यामुळे कामकाजात मर्यादा निर्माण झाल्या आहेत.
विद्यमान तहसीलदार कोरोनामुळे दीर्घ रजेवर गेले असता, या ठिकाणी अचलपूर येथील नायब तहसीलदार अक्षय मंडवे यांना प्रभारी तहसीलदार म्हणून पाठविण्यात आले होते. त्यांचा चांदूर बाजार येथील कामाचा अनुभव पाहता, यावेळीही त्यांनाच प्रभारी म्हणून पाठविण्याची शक्यता नाकारता येत नाही.