मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या ढाकणा परिक्षेत्रातील वाघ शिकार प्रकरणाच्या पहिल्या तक्रारीची सुनावणी येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात पूर्ण झाली असून मेळघाट टायगर क्राईम सायबर सेलने दाखल केलेल्या पहिल्या तक्रारीवरील निकालाची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निकाल येण्याची शक्यता न्यायालयीन सुत्राने वर्तविली. विदर्भातील वाघ शिकार प्रकरणाचे अमरावती, नागपूर, दिल्ली आदी ठिकाणच्या न्यायालयात खटले सुरु आहेत. मेळघाट वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखा स्थापना झाल्यावर जवळपास ४0 पेक्षा अधिक तस्करांच्या मुसक्या आवळून त्यांना जेरबंद करण्यात यश आले आहे. पुणे, दिल्ली, आंध्रप्रदेश ओरिसा, उत्तराचल, मध्यप्रदेश व मेळघाटच्या सिनबंस, मोथाखेडा आदी ठिकाणी स्थानिक रहिवाश्यांच्या मदतीने वाघाची शिकार करुन अवयवयाची तस्करी करण्यासारखे गंभीर आरोप ठेवून अटक करण्यात आली होती. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव विभागांतर्गत येणार्या ढाकणा वनपरिक्षेत्रात डिसेंबर २0१२ मध्ये वाघाची हत्या करण्यात आली होती. तर ४ मार्च २0१३ मध्ये प्रकरण उघडकीस आले होते. सदर प्रकरणात मेळघाटच्या सिनबन व मोथाखेडा या गावातून मधुसिंग, विनोद पवार, चिंताराम अनेंश राठोड, नरविलाल, सागरलाल, मिश्रीलाल या सहा तस्करांना पहिल्या तक्रारीवर अटक करण्यात आली होती. वाघाची नियोजनबद्ध शिकार करण्याचा त्यांच्यावर आरोप आहे. अचलपूर जिल्हासत्र न्यायालयातून हे प्रकरण ३0 मे २0१३ रोजी येथील मुख्य न्यायदंडाधिकारी जयंत राजे यांच्या न्यायालयात वर्ग करण्यात आले. त्यावर पुरावे, साक्षीदार, उलट तपाणी आदी प्रक्रिया १६ फेब्रुवारी पर्यंत पुर्ण करण्यात आली आहे. तर बुधवारी (२८मे) निकाल येण्याची अपेक्षा होती. न्यायालयाने त्यावर पुढील ६ जून ही तारीख दिली आहे. ( प्रतिनिधी)