अमरावती : जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला आता प्रारंभ झालेला असून, प्राथमिक शिक्षण विभागाने शिक्षक बदल्यांचे स्थानिक पातळीवरील संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने २३ एप्रिलपासून प्रक्रिया सुरू केली आहे.
शुक्रवार, २३ एप्रिलला अवघड क्षेत्र घोषित करण्यासाठी पंचायत समिती स्तरावर जिल्हास्तरावर माहिती सादर करणे, बदली पात्र शिक्षकांची यादी तयार करून ते प्रसिद्ध करणे, रिक्त अतिरिक्त पदांचा शाळांनी अहवाल सादर करणे, २६ एप्रिल रोजी जिल्हास्तरावर अवघड क्षेत्र ठरविण्यासाठी समिती स्थापन करून सभा घेणे, २७ एप्रिल रोजी जिल्हास्तरावरील अवघड क्षेत्र व सर्वसाधारण क्षेत्राची यादी जाहीर करणे, २८ ला गटशिक्षणाधिकारी यांना तालुकास्तरावर बदलीपात्र, बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर प्राप्त आक्षेप निकाली काढावे लागणार आहेत. याच दिवशी जिल्हा तसेच तालुका स्तरावर बदली प्रक्रियेसंदर्भात एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित करता येईल. २९ ला न्यायालयीन आदेशासंदर्भात अंमलबजावणी करणे, ३० एप्रिलला जिल्हास्तरावरून समाणिकरणाची रिक्त पदे शाळांनी घोषित करणे तसेच १ मे रोजी शासनाच्या सूचनेनुसार जिल्हास्तरावर बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या जाहीर करणे त्यानंतर आक्षेप स्वीकारणे, अपील सादर करणे याप्रमाणे प्राथमिक शिक्षकांच्या बदलीची कारवाई शिक्षण विभागाकडून केली जाणार आहे.
कोट
प्राथमिक शिक्षकांच्या बदलीच्या अनुषंगाने शिक्षण विभागाने स्थानिक स्तरावर मुदतीत कामे करण्यासाठी शिक्षण विभागाने संभाव्य बदल्याबाबतच्या कारवाईचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही पूर्वतयारी असून शासनस्तरावरून प्राप्त सूचनेप्रमाणे पुढील कारवाई केली जाणार आहे.
- ई. झेड. खान,
शिक्षणाधिकारी (प्राथमिक)