लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : परतीच्या पावसाने काढणीवर आलेल्या सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. शिवाय फुटलेला कापूस भिजला व खराब झाला. त्यामुळे बाधित पिकांचे पंचनामे करून परतावा मिळावा, यासाठी पीक विमा कंपनीकडे १७,४७६ तक्रारी दाखल झाल्या आहेत. कंपनीद्वारा आतापर्यंत ११ हजार पूर्वसूचनांचे पंचनामे करण्यात आलेले नाहीत.
पीक कापणीपश्चात पावसाने नुकसान झाल्यास परतावा मिळण्याची तरतूद पीक विम्यामध्ये आहे. यासाठी पीक नुकसानीचे ७२ तासांच्या आत संबंधित पीक विमा कंपनी किंवा कृषी विभागाकडे याची पूर्वसूचना द्यावी लागते. शुक्रवारी परतीच्या पावसाने सोंगणी व मळणी झालेल्या सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. शिवाय गंजी भिजल्या. या सोयाबीनला कोंब फुटण्याची शक्यता आहे मागच्या हंगामापासून फक्त एक रुपयात शेतकऱ्यांना सहभाग घेता येत असल्याने यावर्षी उच्चांकी म्हणजेच ५.१० लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला आहे. यापूर्वी अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले असल्याने एक लाखावर शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे पूर्वसूचना दाखल केल्या आहेत. आता अतिवृष्टीने पुन्हा कापणीपश्चात नुकसान झाल्याने १७ हजारांवर शेतकऱ्यांनी कंपनीकडे परताव्यासाठी अर्ज केले आहेत.
कंपनीकडे दाखल तालुकानिहाय तक्रारी अचलपूर ८८८, अमरावती १,३०९, अंजनगाव सुर्जी १,७७६, भातकुली १,०२५, चांदूर रेल्वे १,१५१, चांदूरबाजार ९७७, चिखलदरा ७१, दर्यापूर १,०३३, धामणगाव रेल्वे ७५०, धारणी २२९, मोर्शी १,४३३, नांदगाव खंडेश्वर ६,२९१, तिवसा ३३७, वरुड २०६ अशा एकूण १७,४७६ शेतकऱ्यांनी कंपनीकडे पूर्वसूचना पीकविमा कंपन्यांकडे दाखल केल्या आहेत.