अमरावती : जिल्ह्यात १५ एप्रिलपर्यंत कठोर संचारबंदी लागू आहे. त्यामुळे सहकार विभागाची जिल्ह्यातील सर्वच कार्यालये बंद आहेत. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची मतदार यादी तयार करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे मतदार यादीच्या कार्यक्रमाला राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाद्वारा मतदार यादी कार्यक्रमाला आहे, त्या टप्प्यावर बुधवारी स्थगिती दिली.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मतदार यादीसाठी संलग्न सभासद संस्थांकडून ठराव स्वीकारता येत नसल्यामुळे सहकार प्राधिकरणास मार्गदर्शन मागण्यात आले होते. त्याचप्रमाणे जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था अमरावती विभाग हे कार्यालयदेखील बंद ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरळीत व मुक्त वातावरणात पार पाडणे शक्य नसल्याची बाब प्राधिकरणाच्या निदर्शनात आली. त्यामुळे अमरावती जिल्हा सहकारी बँकेचा निवडणुकीकरिता जारी करण्यात आलेल्या मतदार यादीचा ११ मे ते २५ मे दरम्यानच्या कार्यक्रमाला स्थगिती देण्यात आलेली आहे. यानंतर मतदार यादीसाठी स्वतंत्र कार्यक्रम जाहीर करण्यात येणार असल्याचे प्राधिकरणाने जाहीर केले आहे.