अमरावती : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे महापालिकेतील विषय समिती सदस्य निवडीला नगरविकास विभागाने स्थगिती दिली आहे. तसे आदेश महापालिकेला प्राप्त झालेले आहेत. येत्या २० तारखेच्या आमसभेत चारही विषय समिती सदस्यांची निवड करण्यात येणार होती.
महापालिकेच्या शिक्षण, विधी, नगरसुधार, महिला व बालकल्याण या चार विषय समिती सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने २० एप्रिल रोजी होणाऱ्या आमसभेत नव्या सदस्यांची निवड करण्यात येणार होती. प्रत्येक समितीमध्ये नऊ सदस्य असलेल्या या समितीत जाणाऱ्या इच्छुकांची यादीही मोठी आहे. ज्या सदस्यांना चार वर्षांत कुठेच स्थान मिळाले नाही. अशाच सदस्यांची निवड करण्याची प्रत्येक पक्षाची रणनीती आहे. मात्र, आता नगरविकास विभागाच्या या नव्या आदेशाने जुन्या सदस्यांचा कालावधी वाढला आहे. तसेही कोरोना काळात काम करण्याला वाव न मिळाल्याने जुन्या सदस्यांनी पुन्हा निवड करण्याची मागणी पक्षनेत्यांकडे केलेली आहे. त्याला आता बळ मिळाले.
एक महिन्यानंतर कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेतल्यानंतर पुढील निर्णय कळविण्यात येईल, असे नगरविकास विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे इच्छुकांना पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे.
बॉक्स
संक्रमण काळात विधानसभेची पोटनिवडणूक कशी?
कोरोना संसर्गामुळे जर महापालिकेच्या विषय समिती सदस्यांच्या निवडणुका स्थगित करण्यात येत आहे तर पंढरपूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक कशी घेतली जात आहे, असा सवाल महापालिकेचे सभागृह नेते तुषार भारतीय यांनी केला. या निर्णयामुळे सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.