निष्काळजीपणा : अचलपूर रस्त्यावर अडकली वाहने, कंत्राटदाराचा बेजबाबदारपणा परतवाडा : शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीतपणे व्हावा, यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून सुरू असलेल्या अमृत योजनेच्या कामात कंत्राटदाराचा बेजबाबदारपणा सर्वसामान्य नागरिकांसाठी घातक ठरला आहे. रस्त्यावर मोठे खड्डे करून ते व्यवस्थित बंद न केल्याने बुधवारी अचलपूर शहराकडे जाणाऱ्या तहसील मार्गावर अनेक वाहने अडकलीत. जुन्या शहरात अमृत योजनेंतर्गत पाणी पुरवठ्याचे काम सुरू आहे. त्यासाठी ठिकठिकाणी नाली व रस्ते खोदण्याचा सपाटा लावण्यात आला आहे. मात्र हे करताना संबंधित कंत्राटदाराकडून नियम धाब्यावर बसविण्यात येत आहे. बुधवारी तहसील ते झेंडा चौक मार्गावर पेट्रोलपंपानजीक रस्त्यावर खोदकाम करण्यात आले होते. त्यासाठी सदर रस्त्यावरील वाहतूक दुसऱ्या बाजूने वळविणे आवश्यक होते. मात्र त्यासाठी पोलिसांना किंवा संबंधितांना कुठल्याच सूचना देण्यात आल्या नाहीत. परिणामी रस्त्याने ये-जा करणारी अनेक वाहने त्या खड्ड्यात अडकलीत. बुधवारी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत हा प्रकार नागरिकांसाठी डोकेदुखी ठरला होता. (तालुका प्रतिनिधी)ठिकठिकाणी खड्डे परतवाडा - अचलपूर शहरात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. रात्रीला बंद राहत असल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जयस्तंभ चौक ते गुजरी बाजार, सदर बाजार मार्गावरील खड्डे केव्हा बंद होणार हे पालिकेच्या दुर्लक्षामुळे सांगणे कठीण आहे. याच खड्ड्यांमुळे मोठा अपघात होण्याची भीती वर्तविली जात आहे. संबंधित कंत्राटदाराला योग्य सूचना देऊन जलवाहिनीच्या कामामुळे झालेले खड्डे बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सदर मार्गावर वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. - अशोक दुधानी, अभियंता न.प. अचलपूर
‘अमृत’च्या नावावर रस्त्यांवर खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2017 12:19 AM