अमरावती : जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) येथे तीने ते चार तासापासून वीजपुरवठा खंडित झाल्याने याठीकाणी उपचारासाठी भरती असलेल्या गर्भवती महिला तसेच एक ते दोन दिवसांच्या बालकांचे चांगलेच हाल सुरु आहेत. यासंदर्भातील माहिती अमरावती दौऱ्यावर असलेल्या विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी सरकारवर निशाणा साधत या परिस्थितीला जबाबदार यंत्रणेवर कारवाई करण्याची मागणी केली.
जिल्हा स्त्री रुग्णालय येथे शहरासह ग्रामीण भागातील मोठ्या संख्येने गर्भवती महिला या प्रसूतीसाठी येतात. याठीकाणी दोनशे खाटांची सुविधा असतांना रोज सरासरी अडीचशे ते तीनशे गर्भवती महिला याठीकाणी भरती असतात. शनिवारी रुग्णालय परिसरात लाईनचे काम सुरु असल्याने रुग्णालयातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला. परंतु वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी भरती असलेल्या गर्भवती महिला तसेच एक ते दोन दिवसांच्या बालकांसाठी इतर सुविधा करणे अपेक्षीत होते. परंतु प्रशासनाने ती व्यवस्था न केल्याने गर्भवती महिला, प्रसूती झालेली महिला तसेच त्यांचे एक ते दोन दिवसांचे बाळ घेऊन अनेक महिला रुग्णालयाच्या वरंड्यात बसल्याचे चित्र पहायला मिळत होते.
अशातच याची माहिती अमरावती दौऱ्यावर आलेल्या विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांना मिळताच त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. यावेळी त्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद पवार यांना रुग्णालयातील परिस्थिती संदर्भात धारेवर धरले. तसेच त्यांनी सरकार निशाणा साधत जबाबदार यंत्रणेवर कारवाईची मागणी केली.