अमरावती : महावितरणच्या कडबी बाजार केंद्र व आजूबाजूच्या परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याला तांत्रिक दोष कारणीभूत नसून, मानवी हस्तक्षेप आहे. नागरिकांनी महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता सुचित्रा गुजर यांनी पाहणीनंतर केले.
कडबी बाजार व परिसरात वीजपुरवठा करताना चायना मांजा व पंतंग ही अडथळा ठरतात. वीज वाहिन्या, रोहित्र आणि वीजखांबावर पतंग अडकल्याने तसेच मांजा वीजवाहिन्यांमध्ये गुंतल्यामुळे त्या एकामेकांत स्पर्शून फॉल्ट होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. अडकलेली पंतग व मांजा काढण्यासाठी त्या संपूर्ण वीज वाहिनीचा वीज पुरवठा बंद करावा लागतो. चायना मांजा पक्का असल्याने तुटलेला मांजा ओढताना वीज वाहिन्या एकामेकांना घासून प्रसंगी मोठा अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
बॉक्स:
उच्चदाबाच्या वीज वाहिन्यापासून सुरक्षीत अंतर न ठेवता बांधली घरे
११ केव्ही उच्चदाबाच्या वीज वाहिनींपासून सुरक्षित अंतर न ठेवता अनेक नागरीकांनी घरे बांधली. यानंतर मात्र नागरीकच बांबूने ११ केव्ही वीज वाहिन्यांना घरापासून दूर करण्याचे काम करतात. यामुळेही अनेक वेळा वीज पुरवठा खंडित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. विजेच्या अतिरिक्त, अनाधिकृत जोडण्यांमुळे रोहित्र अतिभारित होऊन वीजपुरवठा खंडित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याशिवाय महापालिका, जीवन प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्ता रुंदीकरण, पाईप लाईनच्या कामांसाठी जेसीबी मशीनमुळे काही ठिकाणी महावितरणची भूमीगत वाहिनी तुटल्यानेही वीजपुरवठा खंडित झाला आहे.
बॉक्स:
वीज वाहिन्यांपासून दूर पतंग उडवा
वीज वाहिन्यांपासून दूर मोकळ्या मैदानातच पतंग उडवावी. सुरक्षेचा उपाय म्हणून घराला लागून गेलेल्या वीज वाहिन्यांना कोणीही लाकडी टेकू देऊ नये तसेच विजेचा अनाधिकृत वापर टाळण्याचे आवाहन मुख्य अभियंत्यांनी केले आहे.