मेळघाटातील ४२ गावांना मध्य प्रदेशातून वीजपुरवठा; पाणीपुरवठा खंडित, गावकऱ्यांना प्यावे लागले दूषित पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2022 12:46 PM2022-07-13T12:46:23+5:302022-07-13T13:27:42+5:30
या गावांना महाराष्ट्रातून वीजपुरवठा करणे शक्य नसल्याचे वीज वितरण कंपनीने म्हटले आहे.
अचलपूर (अमरावती) :मेळघाटातील पाचडोंगरी, कोयलारी या गावांचा वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांना दूषित पाणी पिण्याचा प्रसंग ओढावला. त्यामुळे अतिसार होऊन चारजणांचा मृत्यू तर, चारशे जणांवर उपचार सुरू आहेत. ही घटना विजेअभावी पाणीपुरवठा योजना बंद असल्याने झाली आहे. परिणामी, आता मेळघाटातील अतिदुर्गम भागातील ४२ गावांना चक्क मध्य प्रदेशातूनवीजपुरवठा केला जातो. या गावांना महाराष्ट्रातून वीजपुरवठा करणे शक्य नसल्याचे वीज वितरण कंपनीने म्हटले आहे.
३३ केव्ही भैसदेही (मध्य प्रदेश) या उपकेंद्रातून, ११ केव्ही वाहिनीद्वारे, जारीदा स्विचिंग स्टेशनच्या माध्यमातून या गावांना २२० किलोमीटर दूरवर पसरलेल्या वाहिनीद्वारे वीजपुरवठा केला जातो. मेळघाटातील दऱ्या-खोऱ्यांसह घनदाट जंगलातून ही वीजवाहिनी पसरलेली आहे. दरम्यान, या दुर्गम भागातील गावांचा वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. यातच थकीत वीज बिलांमुळे त्या गावांचा व तेथील योजनांचा वीजपुरवठा वीज वितरण कंपनीकडून खंडित केला जातो. वीज पुरवठा खंडित असलेल्या काळात दुसरीकडून बॅक फिडिंगची व्यवस्था नाही. यातच जारीदा स्विचिंग स्टेशनच्या अगोदर भैसदेही ते जारीदा इन्कमर वाहिनीवर १७ गावे आहेत. त्यानंतर ११ केव्ही जारीदा स्विचिंग स्टेशनमधून एकूण ३ फिडर काढण्यात आले आहेत. याची लांबीही जवळपास १८० किलोमीटर आहे.
राज्य सरकारकडून जनरेटर वापरण्याचा सल्ला
अतिदुर्गम भागातील गावांचा वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. तर दऱ्या-खोऱ्यांसह घनदाट जंगलातील दोष सुधारून वीजपुरवठा सुरळीत होण्यास वेळ लागतो. वीजपुरवठा खंडित असलेल्या काळात अतिआवश्यक सेवा असलेल्या रुग्णालयांनी जनरेटरची पर्यायी व्यवस्था ठेवावी, असे निर्देश राज्य सरकारने वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे.
वलगाव, नया अकाेला येथे अतिसाराची लागण
अमरावतीनजीकच्या वलगाव, नया अकोला येथे जलवाहिनी लिकेजमुळे दूषित पाणी पुरवठा झाल्याने अतिसाराची लागण झाल्याची घटना सोमवारी निदर्शनास आली. अतिसाराने खुशाल दीपकराव घोम (३०, नया अकोला) यांचा सोमवारी मृत्यू झाला. तर १४ रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा प्रकार जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या दुर्लक्षाने झाल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश साबळे यांनी केला आहे. पाचडोंगरी, कोयलारी येथे अतिसाराची घटना उघडकीस आल्यानंतर आता शहर भागातही लागण होत असल्याने खळबळ माजली आहे.