अमरावती: महापालिकेच्या वतीने चालविण्यात येणारी संत गाडगेबाबा स्पर्धा परीक्षा प्रबोधिनी (ग्रंथालय व अभ्यासिका) येथील चार महिन्यांचे वीज बिल थकल्याने महावितरणने वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे मागील पाच दिवसांपासून अभ्यासिकेतील विद्यार्थी हे अंधारात अभ्यास करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जवळपास तीनशे ते साडेतीनशे विद्यार्थी या अभ्यासिकेमध्ये अभ्यास करीत असून, त्यांच्याकडून दरमहा अभ्यासिकेच्या मेंटनससाठी ५० रुपये इतके शुल्कदेखील वसूल केले जाते. परंतु, तरीही अंधारात अभ्यास करावा लागत असल्याने विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
शहरातील मनपा आयुक्तांच्या बंगल्याला लागूनच महापालिकेच्या महिला व बालविकास विभागाअंतर्गत संत गाडगेबाबा स्पर्धा परीक्षा प्रबोधिनी अभ्यासिका चालविण्यात येत आहे. या अभ्यासिकेला स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून पहिली पसंती असून, या ठिकाणी प्रवेश मिळविण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांना वेंटिगवर राहण्याची वेळ येते. या अभ्यासिकेतून अनेक विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यशदेखील संपादित केले आहे. परंतु, मागील पाच दिवसांपासून येथील वीज पुरवठा खंडित झाल्याने विद्यार्थ्यांना अंधारात अभ्यास करावा लागत आहे.
त्यामुळे यासंदर्भात संबधित महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता, अभ्यासिकेत वीज पुरवठा हा उद्यान विभागांतर्गत घेण्यात आलेल्या वीज जोडणीमधून केल्या जात असल्याची माहिती देण्यात आली. परंतु, जर विद्यार्थ्यांकडून नियमित अभ्यासिकेच्या मेंटनसच्या नावावर शुल्क वसूल केले जात असतानादेखील विद्यार्थ्यांना अंधारात अभ्यास करण्याची वेळ का आली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.