अमरावती : आर्थिक वर्षाच्या अखेरीस वीज बिल भरण्यास प्रतिसाद न देणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरणने केली. जिल्ह्यात जवळपास आठ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला तर, जवळपास ७४ कोटी ९४ लाख रुपयांच्या थकीत बिलाची वसुलीदेखील केल्याचे महावितरणचे म्हणणे आहे.
घरगुती ग्राहकांकडून ४५ कोटी, व्यावसायिक ग्राहक १४ कोटी, औद्योगिक ग्राहक ८.७२ कोटी, कृषी ग्राहक २.१८ कोटी, स्ट्रीट लाइट योजना २.७२ कोटी, तर पाणीपुरवठा योजना २.३२ कोटी रुपये असे एकूण ७४.९४ कोटी रुपयांचे थकीत वीज बिल वसूल केल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.
८२ पाणीपुरवठा योजनेचाही वीजपुरवठा खंडित
जिल्ह्यातील १ हजार ९३० पाणीपुरवठा योजनेकडे मार्च अखेर ७७ कोटी १३ लाख ४० हजार रुपयांचे वीज बिल थकीत होते. त्यामुळे यातील ८२ पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांचाही वीजपुरवठा मार्च महिन्यांमध्ये खंडित करण्यात आला. जिल्ह्यातील पथदिव्यांचेही ११५ कोटी रुपये बिल थकीत असल्याने काही गावातील पथदिव्यांचाही वीजपुरवठा महावितरणने खंडित केल्याची माहिती आहे.
मार्च महिन्यात थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने ७४ कोटी रुपयांच्या थकीत बिलाची वसुली केली. तर ज्या ग्राहकांकडून बिल भरण्यास प्रतिसाद मिळाला नाही, अशा ८ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला आहे.
- दिलीप खानंदे, अधीक्षक अभियंता, महावितरण.