- मोहन राऊत
धामणगाव रेल्वे : उष्णतेची लाट विदर्भात सर्वत्र जाणवत आहे. ती किती जीवघेणी आहे, याचा प्रत्यय धामणगावात शनिवारी आला. येथे टिनावर ठेवलेल्या भांड्यात उन्हाच्या तडाख्याने खिचडी शिजून आली.
अमरावती जिल्ह्यात गुरुवारी ४५.९ अंश सेल्सिअस तापमान होते. ते शुक्रवारी किंचित कमी होऊन ४५.४ अंशावर स्थिरावले. तथापि, शनिवारी त्यामध्ये एक अंशाने वाढ होऊन ४६.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. या तापमानाच्या तडाख्याने धामणगावसह जिल्हाभरातील रस्त्यांवर अघोषित अलर्टची स्थिती आहे. शहरातील टिळक चौकातील रहिवासी असलेल्या विठाबाई सोनटक्के यांनी आपल्या घरावरील टिनपत्रावर पसरट भांड्यात तांदूळ व डाळ टाकून ठेवली.
सकाळी ९ वाजता ठेवलेल्या या भांड्यात दुपारी १ वाजेपर्यंत खिचडी शिजलेली आढळल्याचे सदर महिलेने सांगितले. याप्रकरणी धामणगाव एज्युकेशन सोसायटीचे प्राध्यापक अमृत रेड्डी यांनी सांगितले की, भात शिजण्यासाठी १०० अंश सेल्सिअस तापमान भांड्याला मिळायला हवे. तथापि, मिठाचे प्रमाण वाढविल्यास कमी तापमानातही ते शक्य आहे. तथापि, शनिवारचे उन्ह अंग भाजून काढणारे असल्याचे त्यांनी सांगितले.
वाढत्या तापमानामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर अधिक परिणाम होत असून, धामणगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयात उष्मघाताची रुग्ण वाढली असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष सालनकार यांनी दिला.