अमरावती : फिट इंडिया अभियानाला सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी श्री हव्याप्र मंडळाकडे गुरुवारी सोपविण्यात आली. याबाबत मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गौरव केला. या अभियानासाठी महाराष्ट्रातून अमरावती येथील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ या एकमेव संस्थेची निवड करण्यात आली. यासाठी केंद्र शासनाने संस्थेच्या प्रतिनिधींना सन्मानाने बोलावले होते. दिल्ली येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर उद्घाटन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजीजू, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, केंद्रीय मानवसंसाधन मंत्री रमेश पोखरीयाल, क्रिकेटपटू खासदार गौतम गंभीर, राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारप्राप्त अभिनव बिंद्रा, श्रीधर शेट्टी, मनोज तिवारी, बॅडमिंटन जगज्जेता पी.व्ही.सिंधू, राजकीय व क्रीडा क्षेत्रातील गणमान्यांसह मंडळाचे ललित शर्मा, रवींद्र खांडेकर व सुखद चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते.गेल्या आठवड्यात केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजीजू श्री हव्याप्र मंडळात कार्यक्रमात आयोजित एआयसीटीईच्या राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षणाच्या उद्घाटन सोहळ्यात आले होते. त्यावेळी खासदार नवनीत राणा यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली होती. त्याअनुषंगाने संस्थेचा गौरव करण्यात आला.
पंतप्रधानांच्या हस्ते प्रभाकरराव वैद्य यांचा गौरव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 10:08 PM