छायाचित्र काढण्याचा मोह बेतला जिवावर, आठ किलोमीटर अंतरावर मिळाले कलेवर
मोर्शी : अप्पर वर्धा धरणाची सात दारे उघडल्यामुळे कुटुंबासह १६ सप्टेंबर रोजी या प्रकल्पस्थळी आलेल्या ४० वर्षीय युवकाचा शुक्रवारी मृतदेह हाती लागला. छायाचित्र काढण्याच्या नादात धरणाच्या दारांपुढील पुलावरून वर्धा नदीपात्रात कोसळून तो वाहत गेला होता.
प्राप्त माहितीनुसार, प्रफुल्ल अशोक वाकोडे (४०, रा. शिरजगाव बंड, ता. चांदूर बाजार) असे मृताचे नाव आहे. त्याचा मृतदेह तब्बल ११ तासांनंतर जिल्हा आपत्ती प्राधिकरणाच्या शोध पथकाला बेलोरा खंबित गावानजीक असलेल्या वर्धा आणि चारगड नदीच्या संगमावर आढळून आला.
विदर्भातील हे सर्वात मोठे धरण बघण्यासाठी प्रफुल्ल हा कुटुंबासमवेत आला होता. छायाचित्र काढण्याच्या नादात सायंकाळी साडेचारच्या सुमारास पाय घसरून वर्धा नदीच्या पात्रात तो वाहत गेला. या घटनेची माहिती मिळताच वरूड तालुक्यातील श्रीक्षेत्र झुंज येथून जिल्हा आपत्ती प्राधिकरणाचे शोध व बचाव पथक आमदार देवेंद्र भुयार यांच्यासमवेत या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांनी अंधार गडद होण्यापूर्वी गुरुवारी शोधमोहीम राबविली. मात्र, यश प्राप्त झाले नाही.
पथकाने शुक्रवारी सकाळी ७ वाजता पुन्हा शोध सुरू केला. अप्पर वर्धा धरणापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या बेलोरा खंबीतपर्यंत शोधमोहीम राबविली असता, या गावानजीक असलेल्या वर्धा व चारघड नद्यांच्या संगमावर प्रफुल्लचा मृतदेह आढळून आला. पथकाने हा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढला. यानंतर तो शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. मोर्शी पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे.
---------------
आमदारांकडून प्रकल्पस्थळाची पाहणी
आ. देवेंद्र भुयार यांनी या गंभीर प्रकारची दखल घेऊन अप्पर वर्धा धरणावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी असलेल्या उपाययोजनांची पाहणी केली. अप्पर वर्धा धरण ९९ टक्के भरले असल्याने वर्धा नदीच्या प्रवाहात सात दरवाजातून पाणी सोडले जात आहे. यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तात्काळ उपाययोजना करण्यासाठी आ. देवेंद्र भुयार यांनी प्रशासनाच्या सर्व अधिकाऱ्यांची अप्पर वर्धा धरण स्थळावर बैठक घेतली व तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. यावेळी एपीआय आशिष चेचरे, अप्पर वर्धा धरणाचे उपविभागीय अभियंता रमण लायचा, तहसीलदार सिद्धार्थ मोरे, कार्यकारी अभियंता महावितरण मळसने, सहायक अभियंता सोळंके, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नरेंद्र जिचकार आदी उपस्थित होते.