अमरावती : अमरावतीत आज प्रहार संघटनेचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात आमदार बच्चू कडू हे आपली भूमिका स्पष्ट करणार असून त्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, मेळाव्याच्या ठिकाणी 'मै झुकेगा नही' चे पोस्टर लावण्यात आले असून त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून आमदार बच्चू कडू व आमदार रवी राणा यांच्यातील वादामुळे राजकारण चांगलेच तापले होते. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. त्यांच्यातील वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर पडदा पडला. कडू यांच्याविषयी केलेल्या विधानांबद्दल राणा यांनी दिलगिरी व्यक्त केली.
बच्चू कडू व रवी राणा यांना मुख्यमंत्री शिंदे यांनी रविवारी रात्री वर्षा बंगल्यावर बोलावून घेतले. दोन तास दोघांना घेऊन ते बसले. एकमेकांबद्दलची कटूता विसरून एकत्रित काम करा, असा सल्लाही दिला. कडू, राणा हे सोमवारी सकाळी सागर निवासस्थानी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना भेटले. शिंदे, फडणवीस यांनी दोघांनाही कडक शब्दांत समज दिली.
कडू म्हणाले की, राणा यांनी व्यक्त केलेल्या दिलगिरीबाबत मी कार्यकर्त्यांशी चर्चा करून मंगळवारी निर्णय जाहीर करेन. आज बच्चू कडू कार्यकर्ता मेळावा घेणार असून आपली भूमिका जाहीर करतील. मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत. अमरावतीत मेळाव्याच्या ठिकाणी बच्चू कडू यांचे मोठ-मोठे बॅनर्स लावले लावण्यात आले असून त्यावर मै झुकेगा नही.. असे लिहिले आहे. या बॅनरची आता राज्यभर चर्चा होत आहे.
'माझ्या एका कॉलवर कड्डू गुवाहाटीला गेले'
माझ्या एका फोन कॉलवर बच्चू कडू हे गुवाहाटीला शिंदे यांच्याकडे गेले द होते, त्यामुळे त्यांनी सौदा केला वगैरे आरोप करणे चुकीचे आहे, अशा T शब्दात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कडूंविषयी भावना व्यक्त केल्या.