धामणगाव रेल्वे : जिल्ह्यातील काही तालुक्यात संततधार पाऊस सुरू असल्याने अचानकपणे रात्रीच्या बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचा फटका शेकडो प्रवाशांना बसला. अमरावती येथील मध्यवर्ती बस स्थानकावर ते ताटकळत राहिले होते. या प्रवाशांसाठी आमदार प्रताप अडसड हे देवदूत ठरले. त्यांच्या मध्यस्थीने जिल्ह्यातील तीन तालुक्यांमधील शेकडो प्रवासी या संततधार पावसात आपल्या घरापर्यंत पोहोचले.
जिल्ह्यात अनेक दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने दोन दिवसांपासून हजेरी लावली आहे. मंगळवारी अनेक तालुक्यांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. त्याअनुषंगाने परिवहन विभागाने सायंकाळी ७ वाजता अमरावती येथून सुटणाऱ्या धामणगाव, दर्यापूर, परतवाडा येथील रात्रीच्या फेऱ्या अचानक रद्द केल्या. त्यामुळे शेकडो प्रवाशांना या पावसात आपल्या घरी जाणे अशक्य होते. अशातच चांदूर रेल्वे येथील मंगेश राऊत या कार्यकर्त्याने आमदार प्रताप अडसड यांना फोन केला. मी आपल्या पक्षाचा कार्यकर्ता नाही. पण, एक प्रवासी म्हणून चांदूर रेल्वेला जाण्यासाठी आता एकही बस नाही, असे फोनवरून सांगितले. आमदार प्रताप अडसड यांनी मतदारसंघाचा दौरा आटोपल्यानंतर लगोलग अमरावती येथील बसस्थानक गाठले. यानंतर तिन्ही मार्गांवर एसटी बस सोडण्यात आल्या. आमदार प्रताप अडसड आमच्यासाठी देवदूत ठरल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली.