धारणी - तालुक्यातील गोडवाडी येथील प्रतीक्षा भगीरथ पवार या 13 वर्षीय विद्यार्थिनीवर रूबेला लसीकरणमुळे मृत्यूचे संकट ओढावले आहे. प्रतीक्षावर सध्या नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालय उपचार सुरू आहेत. 4 डिसेंबर रोजी रूबेला लसीकरण शैक्षणिक संस्थांमध्ये राबविण्यात आले.
गोडवाडी येथील राहणारी प्रतीक्षा पवार धारणी येथील ज्ञान मंदिर कन्या शाळेत इयत्ता आठवीत शिकत आहे. तिच्यावरसुद्धा 5 डिसेंबर रोजी रूबेला लसीकरण करण्यात आले. त्याच दिवशी संध्याकाळी तिची प्रकृती खालावली. त्याचे हात व पाय निकामी होत असल्याचे लक्षात येताच तिच्या वडिलांनी तिला कळमखार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती केले. रूबेला लसीकरणमुळे प्रतीक्षावर ही अवस्था आल्याचे सांगितले. परंतु, कळमकर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचाराला नकार देत तिचे उपचार खासगी रुग्णालयात करण्याचे सांगून हात वर केले.
धारणी उपजिल्हा रुग्णालयात चार दिवस उपचार
धारणी उपजिल्हा रुग्णालयात चार दिवसांपासून उपचार घेऊनही फायदा होत नसल्याचे पाहून प्रतीक्षाला अमरावती येथील डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. परंतु, तेथेसुद्धा प्रतिसाद न मिळाल्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु तेथे सुद्धा फायदा होत नसल्यामुळे वडिलांनी तिला नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात हलविले आहे. याबाबत आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतीक्षावर आलेला हा प्रसंग रूबेला लसीकरणाचे नसल्याचे सांगून हात वर केले असले तरी त्यांचे वडील भगीरथ पवार यांनी रूबेला लसीकरणनंतरच ही वेळ आल्याचे सांगितले.
मेळघाटात आरोग्य विभागात मोठमोठे दावे करणारे आरोग्य अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे मेळघाटात कुपोषणमुक्तीचे धडा गिरवणारे गैरशासकीय संघटनांनीसुद्धा प्रतीक्षाच्या गरीब आई-वडिलांकडे आपुलकीने पाहण्याची आवश्यकता आहे.