चिखलदरा (अमरावती) : चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ आरोग्य केंद्रांतर्गत पिपल्या गावातील बुदिया कासदेकर या प्रसूत महिलेचा रुग्णालयात पोहाेचण्यापूर्वी वाटेतच मृत्यू झाल्याची घटना घडली. विशेष म्हणजे, यावेळी एकही आरोग्य कर्मचारी गर्भवती महिलेसोबत नसल्याची माहिती समोर आली आहे.
पिपल्या गावातील अति जोखमीची माता म्हणून नोंद असलेल्या बुदिया कासदेकर (२६) या गर्भवती मातेला २८ डिसेंबर रोजी प्रसववेदना सुरू झाल्या. मात्र, गावात एकही आरोग्य कर्मचारी उपलब्ध नसल्याने गावातील दाईने प्रसूतीसाठी प्रयत्न केला. परंतु दाईला अडचण जात असल्याचे लक्षात आल्याने तत्काळ महिलेला रुग्णालयात उपचारासाठी हलविण्याचे ठरविले. त्यानंतर आशा सेविकेसह घरच्यांनी रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रात्री ११ वाजता दरम्यान चुरणी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र वाटेत रुग्णवाहिकेत महिलेने प्राण सोडला. तर, या महिलेला रुग्णालयात हलविण्यात आले तेव्हा एकही आरोग्य कर्मचारी सोबतीला नव्हता.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ती गर्भवती महिला पाचव्यांदा गर्भवती असताना आणि जोखमीच्या मातांमध्ये नोंद असतानाही तिची एकदाही सोनोग्राफी केली नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. अशावेळी आरोग्य कर्मचारी कुठे होते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, गर्भवती महिलेचा मृत्यू कशाने झाला याची माहिती शवविच्छेदन नंतरच मिळणार आहे.
मातेला रुग्णालयात दाखल केले तेव्हा मृत झाली होती. तिचा घरी किंवा वाटेतच अतिरक्त स्राव झाल्यामुळे मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. त्यासाठी महिलेचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे त्यांच्याकडे कोणतेही वैद्यकीय रेकॉर्ड उपलब्ध नव्हते.
- डॉ. रोशन इंगळे, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय चुरणी
सदर महिलेचा मृत्यू चुरणी रुग्णालयात झाल्याची माहिती मला मिळाली. मात्र मृत्यू कशामुळे झाला याची चौकशी करण्यात येईल. त्यानंतरच खरे कारण पुढे येईल.
- डॉ. राजश्री माहूरकर, वैद्यकीय अधिकारी काटकुंभ पीएचसी