सारडा महाविद्यालयातील वनस्पतिशास्त्र विभाग, कार्ड संस्था घेणार पुढाकार
अंजनगाव सुर्जी : स्थानिक श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालयातील वनस्पतिशास्त्र विभाग व अंजनगावची कार्ड संस्था या परिसरात उत्पादन घेतल्या जाणाऱ्या पिंपरी या औषधी वनस्पती पिकाच्या भौगोलिक चिन्हांकनाकरिता पुढाकार घेतला आहे.
भौगोलिक चिन्हांकन ही एकप्रकारे मानांकनाची नोंद असून, ही भौगोलिक क्षेत्राशी निगडित आहे. नैसर्गिकरीत्या व मानवी प्रयत्नातून उत्पादित होणाऱ्या शेतीमालाची ओळख, गुणवत्तेतील सातत्य आणि यांच्यामधील विशेष गुणधर्माचे जतन करण्यासाठी हे चिन्हांकन महत्त्वाचे आहे. या नोंदीमुळे विकास, कायदेशीर संरक्षण, अनाधिकृत विक्रीस प्रतिबंध, निर्यातीसाठी अधिक संधी तयार होऊन यात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्रँड तयार होण्यास मदत होऊ शकते व जागतिक पातळीवर व्यापारी महत्त्व वाढण्यास मोलाची मदत होईल. त्याकरिता आवश्यक तांत्रिक मदत करण्यास महाविद्यालयातील वनस्पतिशास्त्र विभाग तयार आहे, असे कृषी आयुक्तालय अंतर्गत महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ पत्र तांत्रिक सल्लागार (निर्यात), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे नागार्जुन औषधी वनस्पती उद्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व विभागीय औषधी वनस्पती सुविधा केंद्राला कळविले आहे. प्राचार्य वशिष्ठ चौबे व वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मंगेश डगवाल यांनी त्यासाठी पुढाकार घेतला.
पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये जवळपास ८०० हेक्टर क्षेत्रात पिंपरीची लागवड पूर्वीपासून केली जाते. यामध्ये अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी शेतकऱ्यांचा बऱ्यापैकी समावेश आहे. अशा प्रकारची या क्षेत्रातील लागवड ही देशातील एकमेव असून या भागातील जवळपास दहा हजार शेतकरी कुटुंबांचे हे उपजीविकेचे साधन ठरले आहे. पिकास भौगोलिक चिन्हांकन प्राप्त झाल्यास या भागातील शेतकऱ्यांना चांगल्या संधी उपलब्ध होतील. त्यासाठी तांत्रिक बाबीची मदत व तयारी करण्यास महाविद्यालयाचा वनस्पतिशास्त्र विभाग तयार आहे. सोबतच कार्ड संस्थेशी समन्वय करार अंतर्गत पाठपुरावा करून गती दिली जाईल. वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख डॉ. मंगेश डगवाल व कार्ड संस्थेचे मुख्य कार्यकारी विजय लाडोळे यांनी ही माहिती दिली.